कल्याण - राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीतील भाजपाचे उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी आक्षेपाह्र्य पोस्ट फेसबुकवर टाकल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी,अशी तक्रार राष्ट्रवादी कल्याण डोंबिवली शहर पदाधिका-यांच्या वतीने शुक्रवारी खडकपाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाच्या अन्य नेत्यांची मानहानी बदनामी करण्याचा हा प्रकार असून भीमा-कोरेगांव प्रकरणानंतर समाजात अशा पोस्टच्या माध्यमातून पुन्हा हिंसेचे वातावरण निर्माण करण्याचा खटाटोप भाजपच्या मंडळींकडून सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांनी केला आहे. दरम्यान उपमहापौर भोईर यांनी हे सर्व आरोप फेटाळुन लावले आहेत. संबंधित पोस्ट ही आक्षेपाह्र्य नाही तर हल्लाबोल आंदोलनावर एक उपहासात्मक टिका होती असे ते म्हणाले.
17 जानेवारीला भोईर यांनी ही पोस्ट फेसबुकवर टाकली आहे. आजकाल कोणी काय करावे याला काही धरबंधच उरला नाही! आता हेच पहा ना! आयुष्यभर महाराष्ट्राच्या तिजोरीवर डल्ला मारणारी अलिबाब आणि चाळीस चोरांची ही टोळी आता हल्लाबोल यात्रेला निघाली आहे. यालाच म्हणतात सौ चुहे खा के बिल्ली चली हज ! असे मत पोस्टद्वारे प्रदर्शित करून त्याच्या खाली शरद पवार यांचा काटरुन स्टाईल नोटा हातात घेतलेला फोटो तसेच अजित पवार, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे, चित्र वाघ, प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक आदि नेत्यांचे फोटो काटरुनला जोडले गेल्याकडे राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी लक्ष वेधले आहे. या फोटोखाली अन्य काही मजकुर प्रदर्शित करण्यात आला आहे. एकंदरीतच ही पोस्ट आक्षेपाह्र्य असून याप्रकरणी उपमहापौरांवर कारवाई व्हावी अशी मागणी पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रार अर्जात करण्यात आली आहे. पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देताना जिल्हाध्यक्ष हनुमंते यांच्यासह जिल्हा सरचिटणीस जे सी कटारीया, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष निरंजन भोसले, जिल्हा उपाध्यक्ष उदय जाधव, कार्याध्यक्ष वल्ली राजन, राजेंद्र नांदोस्कर, मनोज नायर, उमेश बोरगांवकर अदि पदाधिकारी उपस्थित होते. आक्षेपार्ह असे काहीही नाही त्या पोस्टमध्ये आक्षेपार्ह असे काहीही नाही. हा अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा भाग आहे. विरोधकांनी मागील काही वर्षे जे प्रताप केले आहेत ते उपरोधिक पोस्टद्वारे हल्लाबोल आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर मांडले गेले आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात देखील अनेक आक्षेपाह्र्य पोस्ट विरोधकांकडून टाकल्या जातात. त्यामुळे यापुढे आम्हीही अशा पोस्टवर हरकत घेऊन संबंधितांची तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करू असे उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.