ठाणे : ठाण्यातील थीम पार्क व बॉलीवूड पार्कच्या चौकशीसाठी नेमलेल्या चौकशीचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच त्यावर आक्षेप घेऊन भाजपाचे गटनेते नारायण पवार, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी तिचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी पालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी गिरीश मेहंदळे यांनीसुद्धा या समितीत काम करण्यासाठी नकार दर्शवणारे पत्र दिले आहे. त्यामुळे ती अर्धवट स्थितीत असून चौकशीचा केवळ फार्स ठरणार की काय, अशी चर्चा मात्र सुरू झाली.
काही दिवसांपासून बॉलीवूड आणि थीम पार्कच्या मुद्यावरून ठाणे शहर चांगलेच चर्चेत आले आहे. परंतु, आयुक्तांनी चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या ठेकेदाराची भेट घेतल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी सेनेची नेतेमंडळी या ठेकेदाराची भेट घेत असल्याचे प्रकरण समोर आणले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी काय होणार, असा सवाल केला होता. तर, भाजपानेही सत्ताधारी आणि प्रशासनावर याच मुद्यावरून आगपाखड केली आहे. अशा प्रकारे सत्ताधारी, प्रशासन ठेकेदाराबरोबर भेटीगाठी घेत असतील, तर पारदर्शक चौकशी कशी होणार, असा सवाल पक्षाचे गटनेते नारायण पवार आणि माजी गटनेते मिलिंद पाटणकर यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, आता या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सत्ताधारी आणि प्रशासन ठेकेदाराला भेटण्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादी, भाजपाने आक्षेप घेतल्यानंतर भाजपा गटनेते नारायण पवार आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील हे यासंदर्भात नेमलेल्या समितीचा राजीनामा देणार असल्याचे समोर आले आहे.
आम्ही टेक्निकल पर्सन नाही. त्यात सत्ताधारी आणि प्रशासन ठेकेदाराची भेट घेत असतील, तर चौकशी काय होणार. त्यामुळेच मी समितीमधून बाहेर पडत आहे.नारायण पवार, गटनेते - भाजपा