मीरारोड - भाईंदरच्या शेवटच्या मेट्रो स्थानक लगत मोठ्या प्रमाणात मोकळ्या जमिनी असताना काही किमी लांब डोंगरी येथील डोंगरावर मेट्रो कारशेड कशाला ? असा सवाल करत कारशेडसाठी साडे आकरा हजार झाडे काढण्यास आजच्या पालिकेतील सुनावणी वेळी विरोध दर्शवला गेला. निसर्ग व वन्य जीव वाचवा असे फलक फडकावत ग्रामस्थांसह राजकीय पक्ष व संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दहिसर - भाईंदर मेट्रो ९ साठी डोंगरीच्या डोंगरावर कारशेड साठी पहिल्या टप्प्यात १ हजार ४०६ झाडे तर दुसऱ्या टप्प्यात ९ हजार ९०० झाडे काढण्यास विरोध होत आहे. शुक्रवारी महापालिका मुख्यालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी डोंगरी चर्चचे फादर ऑस्कर मेंडोन्सा, माजी नगरसेविका शर्मिला बगाजी, हेरल बोर्जिस, जॉर्जी गोविंद, माजी सरपंच एडविन घोन्साल्विस, एडवर्ड कोरिया, डॅनी घोन्साल्विस, फ्रिडा मोरायस, शॉन कोलासो आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष ममता मोरायस, मनसेचे हेमंत सावंत, अभिनंदन चव्हाण, आप चे ब्रिजेश शर्मा, दुर्गेश पाल, गो ग्रीन फाउंडेशनचे वीरभद्र कोनापुरे, फॉर फ्युचर इंडियाचे हर्षद ढगे, खशबु भट आदींनी देखील झाडांच्या कत्तलीस विरोध केला.
मेट्रो स्थानक जवळ मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागा असताना डोंगरीच्या डोंगरावर स्थानिकांची घरे आणि झाडे , वन्यजीव व निसर्ग उध्वस्त करून कोणाचा विकास साधला जात आहे असा संताप व्यक्त केला. यावेळी झाडे, वन्यजीव व डोंगरी - उत्तन परिसर वाचवा असे फलक फडकवून कारशेड रद्द करण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला. ह्या वृक्षतोडीने शहरातील प्रदूषण व उष्णता वाढण्यासह मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना मिळणाऱ्या ऑक्सिजन व शुद्ध हवेवर परिणाम होणार आहे.
शहरातील नागरिक निसर्गाचा आनंद व शुद्ध हवा घेण्यासाठी ह्या भागात येतात. त्यामुळे विध्वंस करून विकास नको अशी भूमिका उपस्थितांनी मांडली. कारशेड साठी झाडे काढण्याच्या नोटीसवर सुनावणी घेणाऱ्या उपायुक्त कल्पिता पिंपळे यांनी सांगितले कि, एकूण ७१४ तक्रारी अर्ज आले असून शुक्रवारच्या सुनावणी वेळी ३८ जणांची नोंद झाली आहे. सुनावणी वेळी उपस्थितांनी मांडलेले म्हणणे हे आयुक्तां कडे सादर करणार आहोत.