ठाणे : जनसंवाद कार्यक्रमात फेरीवाल्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांवरच गंभीर आरोप केल्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी शहरातील फेरीवाल्यांवर सोमवारपासून कारवाई करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले. त्यामुळे फेरीवाल्यांचा प्रश्न चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
आपल्या पहिल्याच जनसंवाद कार्यक्रमात स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाईचे आदेश महापौरांनी दिल्यानंतर सोमवारी दुसºया जनसंवादात फेरीवाला संघटनांनी अधिकाऱ्यांवरच आरोप केले. कारवाईच करणार असाल तर नोंदणीसाठी घेतलेले हजार रुपयांचे नोंदणीशुल्क परत देण्याची मागणी करण्याबरोबरच अधिकारीच जागा विकत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर आक्र मक झालेल्या महापौरांनी फेरीवाल्यांना त्यांचे नोंदणी शुल्क परत देऊन स्टेशन परिसर, नौपाडा, बी केबिन, सुभाष पथ अशा सर्वच परिसरात फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. कोणी फेरीवाले कायद्याचा धाक दाखवत असतील, तर त्यांना कायद्यानेच उत्तर द्या, असे सांगून यापुढे या परिसरात एकही फेरीवाला बसणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे स्पष्ट आदेश महापौरांनी दिले.पहिल्या महापौर जनसंवादामध्ये प्रशासन फेरीवाल्यांना स्टेशन परिसरात बसू देत नाही, अशी तक्र ार फेरीवाला संघटनांनी केली होती. त्यावेळी महापौरांनी स्टेशन परिसर सोडून इतर ठिकाणी फेरीवाल्यांना बसू देण्याचे आदेश दिले होते. फेरीवाल्यांकडून जागा विकल्या जात असल्याचा आरोप महापौरांनी केला होता. त्यामुळे एकही फेरीवाला या ठिकाणी बसणार नाही, असे महापौरांनी सांगितले होते. हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करून कोणीही फेरीवाले जागा विकत नसून अधिकारीच असे कृत्य करीत असल्याचा आरोप फेरीवाला संघटनांनी केला. कारवाईच करणार असाल तर नोंदणी शुल्क परत करण्याची मागणी त्यांनी केली.सोमवारपासून कारवाई सुरूफेरीवाला संघटनांच्या आरोपांमुळे महापौर संतप्त झाले. बिनबुडाचे आरोप करू नका, असे सांगून फेरीवाल्यांना त्यांचे नोंदणी शुल्क परत हवे असेल तर ते त्यांना द्यावे, यामुळे महापालिकेचे फारसे आर्थिक नुकसान होणार नाही. मात्र, यापुढे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेऊन स्टेशन परिसरात एकही फेरीवाला यापुढे दिसता कामा नये. आजपासूनच या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. त्यामुळे स्टेशन परिसरात बसणाºया फेरीवाल्यांवर सोमवारपासून प्रशासनाने कारवाईस सुरु वात केली आहे.