कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात उभ्या राहत असलेल्या सिटी पार्क प्रकल्पाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या जमीनधारकांना नियमानुसार मोबदला देण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या नगररचना विभागास दिले आहेत.
मंजूर विकास आराखड्यानुसार गौरीपाडा येथील आरक्षणावर सिटी पार्क विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम दोन टप्प्यांत होणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्याच्या कामाचे कार्यादेश १९ मे २०१८ रोजी दिले. पहिल्या टप्प्याचे काम २४ महिन्यांत पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र, आरक्षित जमिनीपैकी १० टक्के जमीन खासगी मालकांची आहे. ही जमीन अद्याप संपादित झालेली नसल्याने सिटी पार्कच्या कामाची गती मंदावली आहे. कंत्राटदाराकडून प्रकल्पाकरिता भरणी करण्यात आली आहे. खासगी जमीन मालकांनी हस्तांतरणीय विकास हक्क मिळेपर्यंत काम करण्यास मनाई केली आहे. काम पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक आहे. यासाठी आयुक्त सूर्यवंशी यांनी त्यांच्या स्तरावर जमीनधारकांची उचित सुनावणी घेऊन भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी सिटी पार्कच्या जागेवर प्रत्यक्ष पाहणी केली. आयुक्तांच्या सुनावणीनंतर जमीनधारकांनी आयुक्तांच्या आदेशाला सहमती दर्शवीत काम सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे बुधवारपासून आवार भिंतीचे काम पुन्हा सुरू झाले. जमीनधारकांना नियमानुसार मोबदला देण्यासाठी कार्यवाही सुरू करण्याचे आदेश नगररचना विभागाला देण्यात आले आहेत.
फोटो-कल्याण-सिटी पार्क
------------------