लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापौर लीलाबाई अशान यांनी आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेतली. कोरोनाचा प्रादुर्भावा रोखण्यासह शहरातील कोविड रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश त्यांनी दिले.
शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली. कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यात मनपाला यश आले असून तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापौरांनी ही बैठक घेतली. त्यात लसीकरणावर जोर देण्यात आला असून कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच दररोज १० हजारांपेक्षा जास्त कोरोना टेस्टिंगचे टार्गेट ठेवण्यात आल्याची माहिती नगरसेवक अरुण अशान यांनी दिली. कोरोनाकाळात स्मशानभूमीत लाकडे नसल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे अशा स्मशानभूमींच्या ट्रस्टींवर कारवाईचे आदेश महापौरांनी दिले. राज्यात कोविड रुग्णालयांना आगी लागून वित्त व जीवितहानी झाली. अशा घटना टाळण्यासाठी महापौरांनी शहरातील कोविड रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे तसेच रुग्णसंख्या वाढल्यास रुग्णवाहिका त्वरित पुरविण्याचे आदेशही दिले.
आयुक्तांनी भूमिका स्पष्ट केली नाहीमहापौरांनी शहरातील विकास कामे व विविध समस्यांबाबत आयुक्तांच्या उपस्थित शहरातील समस्यांचा उल्लेख करून वाहवा मिळविली. मात्र, १५ दिवसांच्या सुटीवरून पालिका सेवेत दाखल झालेल्या आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी साधी प्रतिक्रियाही व्यक्त केली नाही.
बैठकीला उपमहापौर भालेराव गैरहजरnया बैठकीला आयुक्त डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, मदन सोंडे, मुख्य लेखा अधिकारी, विभागप्रमुख उपस्थिती होते. nयापूर्वी महापौर अशान व उपमहापौर भगवान भालेराव हे दोघे संयुक्तपणे अधिकाऱ्यांच्या बैठका घेत होते. मात्र, यावेळी उपमहापौर भालेराव महापालिकेत असूनही महापौरांच्या आढावा बैठकीकडे फिरकले नाही. गेल्या महिन्यात त्यांनी भाजप गोटात प्रवेश केला. म्हणूनच त्यांनी ही बैठक टाळल्याची चर्चा आहे.