लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वर्तकनगर येथील वेदांत या खासगी कोविड रुग्णालयातील चार रुग्णांच्या मृत्युची भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाºयासह सहा जणांच्या उच्चस्तरीय समितीच्या मार्फतीने चौकशीचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही दिल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.वेदांत रुग्णालयात अवघ्या १२ तासांच्या अंतराने चार जणांचा मृत्यु झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण ठाणे शहरात सोमवारी एकच खळबळ उडाली. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाचा हालगर्जीपणा असल्याचा आरोप करीत संताप व्यक्त केला. तर रुग्णालय प्रशासनाने मात्र रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळेच त्यांचे मृत्यु झाल्याचा दावा केला. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी या रुग्णालयात जाऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. त्यावेळीही रुग्णालय प्रशासनाने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी सहा तज्ज्ञांची समिती नियुक्ती केली आहे. या समितीच्या मार्फतीने नि:पक्षपणे चौकशी केली जाईल. जे काय असेल ते सत्य बाहेर येईल. चौघांचा मृत्यु होणे ही निश्चितच दुर्दैवी घटना आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. या समितीमध्ये भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज आशिया, जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय आरोग्य अधिकाºयांसह सहा जणांचा समावेश आहे. हा अहवाल तातडीने देण्याच्या सूचनाही या समितीला देण्यात आल्या आहेत. जो अहवाल येईल, त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाणार असून कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.*रुग्णाचा मोबाईल चोरीस गेल्याची तक्रारवेदांतमध्ये मृत पावलेल्या चार पैकी अरुण शेलार (५१) यांचा मोबाईलही रुग्णालयाकडून गहाळ झाल्याची तक्रार शेलार कुटूंबीयांनी थेट पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. तसेच रुग्णालयाने बिलाचीही मागणी केल्याचे अन्य एका नातेवाईकाने सांगितले. तेंव्हा शिंदे यांनी तातडीने रुग्णालय प्रशासनाला बिलासाठी कोणताही मृतदेह अडवून ठेवू नये तसेच रुग्णाचा मोबाईल दिला नाही तर चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेशही पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांना दिले.
वेदांतमधील रुग्णांच्या मृत्युप्रकरणी आयएएस अधिकाऱ्यासह सहा तज्ज्ञांच्या मार्फतीने चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 6:09 PM
वर्तकनगर येथील वेदांत या खासगी कोविड रुग्णालयातील चार रुग्णांच्या मृत्युची भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाºयासह सहा जणांच्या उच्चस्तरीय समितीच्या मार्फतीने चौकशीचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले.
ठळक मुद्दे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा रुग्णाचा मोबाईलही चोरीस गेल्याचा आरोप