भिवंडी : मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागांना पूरस्थितीचा फटका बसतो. या आपत्तीचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे, अशी माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी विभागीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली.भिवंडी शहर खाडीकिनारी असल्याने मुसळधार पाऊस सुरू असताना भरतीच्या काळात शहराला अनेकवेळा पुराचा फटका बसला आहे. शहरातील सर्व बाजूंचे सांडपाणी खाडीत सोडले जाते. अशावेळी खाडीला भरती आल्यानंतर ते पाणी खाडीत न जाता खाडीकिनाºयावरील क्षेत्रात थांबते. या काळात घेण्यात येणाºया खबरदारीच्या उपाययोजनांमध्ये सर्व सरकारी विभागांचा समावेश व्हावा, यासाठी पालिका आयुक्त हिरे यांनी आपत्कालीन पूर्वनियोजन बैठक घेतली. या बैठकीला शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, टोरंट पॉवर कंपनीचे अधिकारी, एसटी महामंडळ भिवंडी आगारप्रमुखांचे प्रतिनिधी, बीएसएनएलचे अधिकारी उपस्थित होते.आयुक्त हिरे यांनी शहरातील परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर सांगितले की, शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून शहरातील सर्व मुख्य नाल्यांची सफाई सुरू केली आहे. तसेच काही ठिकाणी नाल्यांची रुंदी व खोली वाढवण्यात येत आहे. काही नाल्यांची डागडुजी सुरू केली आहे. हे काम ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या आहेत. तसेच गटारांची सफाई सुरू केली आहे. महापालिकेत मुख्य आपत्कालीन कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. आवश्यक साधनसामग्री तयार ठेवली आहे. तसेच नियंत्रण कक्षात वायरलेस सेवा,वॉकीटॉकी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सर्व प्रभाग समिती कार्यालयात १ जूनपासून स्वतंत्र आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये स्वतंत्र कर्मचाºयांची नेमणूक करण्यात येणार आहे. दरम्यान, पावसाळ्यात झाडे पडून दुर्घटना होऊ नये, म्हणून अगोदरच शहरातील झाडांची छाटणी सुरू केली आहे. तातडीची बाब म्हणून उद्यान विभागात स्वतंत्र झाडछाटणी पथक तैनात केले आहे. अग्निशमन विभागाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. खाडीकिनारी असलेली ईदगाह झोपडपट्टी, म्हाडा कॉलनी, संगमपाडा, अंबिकानगर, बंदर मोहल्ला या सर्व ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यास जवळच्या शाळेत, सांस्कृतिक केंद्रात पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. तसेच त्या ठिकाणी नागरिकांची खाण्यापिण्याची सोय केली जाणार आहे. रस्त्यांचे नवीन खोदकाम करण्यास मनाई करण्यात आली आहे. जिथे गटारावर उघडी झाकणे नाहीत, तेथे तातडीने नवीन झाकणे लावावीत, याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच डोंगरउतारावर राहणारे रहिवासी, झोपडपट्टीतील नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून नोटिसा बजावल्या आहेत. अतिधोकादायक इमारती पडून दुर्घटना घडू नये, म्हणून अशा इमारती रिकाम्या करण्याच्या सूचना प्रभाग अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत.
आपत्कालीन यंत्रणांची झाडाझडती, नाल्यांची डागडुजी ३१ मे पूर्वी करण्याचे आयुक्तांनी दिले आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:10 AM