ठाणे : विना हेल्मेटने तुटलेल्या नंबरप्लेटच्या दुचाकीवरून जाणा-या दोघांना वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी तीन हातनाक्यावर अडवले. त्यानंतर, होणारी कारवाई टाळण्यासाठी ट्रॅफिक वॉर्डनला धक्काबुक्की करत पितापुत्राने डोके आपटून घेतल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी पितापुत्रासह तिघांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ मे रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास तीनहातनाका येथे वाहतूक शाखेचे हवालदार कुंडलिक काकडे, अप्पासाहेब तमखाणे, पालांडे आणि वॉर्डन नितीन पारकर हे कार्यरत होते. त्याचवेळी नाजीर अहमद शेख (२५, रा. मुंबई) आणि त्याचे वडील अहमद हे दोघे एका दुचाकीवरून मल्हार सिनेमागृहाकडून तीनहातनाक्याकडे आले. नाजीर विनाहेल्मेट होता. शिवाय, दुचाकीची नंबरप्लेटही तुटलेली असल्याने तमखाणे यांनी त्यांना कागदपत्रांची विचारणा केली. त्यांच्याकडे कागदपत्रेही नव्हती. त्यामुळे हेल्मेट नसणे, नंबरप्लेट तुटलेली लावणे आणि कागदपत्रे नसणे, या तीन कलमांची पावती त्यांना देण्यात आली. तेव्हा संतापलेल्या नाजीरने त्यांच्याशी हुज्जत घातली. सौजन्याने बोलण्याची समज वॉर्डन पारकर यांनी दिल्यावरही नाजीरने मात्र ‘गोळ्या घालून मारून टाकीन, एकेकाला उडवून देईल’, अशा धमक्या दिल्या. तिथे आलेले वाहतूक सेनेचे तथाकथित अध्यक्ष पिरजादे यांनीही या दोघांना ‘डोके आपटून घ्या, मग पोलिसांकडे बघतो’ असे सांगितले. त्यानंतर, नाजीर आणि त्याच्या वडिलांनी डोके आपटून घेत वाहतूक शाखेच्या चौकीतच धुमाकूळ घातला. दरम्यान, नाजीरला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नाजीरसह तिघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी सांगितले.
वाहतूक पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी ठाण्यात पितापुत्राने डोके आपटून घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 10:58 PM
कारवाई टाळण्यासाठी विना हेल्मेटने आलेल्या दुचाकीवरील पितापुत्राने स्वत:चेच डोके आपटून घेत तीन हात नाक्यावरील वाहतूक चौकीत गोंधळ घातला. पोलिसांनाच गोळया घालण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली.
ठळक मुद्देगोळ्या घालण्याचीही दिली धमकीट्रॅफिक वार्डनला केली धक्काबुक्कीवाहतूक चौकीतच घातला गोंधळ