ठाणे : जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची नेतेपदी निवड झाल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने सोमवारी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्याकरिता आलेल्या शिवसैनिकांकरिता तब्बल सहा हजार वडे तळण्यात आले. गेले काही दिवस देशात विरोधी पक्षांकडून पकोडे तळण्याचे आंदोलन सुरू असताना गडकरी कट्ट्यावरील शिवसेनेच्या हजारो वडे तळण्याची खमंग चर्चा रंगली होती.येथील शक्तिस्थळावर सायंकाळी ६.३० वाजता शिंदे यांचा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते सत्कार झाला. यापूर्वी शिंदे यांचे विविध ठिकाणी सत्कार झाले. परंतु, जिल्ह्यातील शिवसेनेच्या वतीने सोमवारी सत्कार झाला. या कार्यक्रमपासाठी दूरवरून आलेल्या शिवसैनिकांना वाटण्याकरिता थोडेथोडके नव्हे, तर तब्बल सहा हजार वड्यांची आॅर्डर शहर शाखेने दिली. वडे तयार करण्याचे काम सोमवारी सकाळपासूनच सुरू झाले. सायंकाळी ५ वाजता टप्प्याटप्प्याने हे वडे कार्यक्रमस्थळी रवाना झाले. डझनभर कर्मचारी कामाला लागले होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी प्रत्येकाच्या हातात वडे आणि पाण्याच्या बाटल्या दिल्या. त्यामुळे उपस्थितांनी सत्काराच्या कार्यक्रमाबरोबरच या चटकदार वड्यांचा आस्वाद घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पकोड्यांबाबत केलेल्या विधानांमुळे देशात राजकारण सुरू असून राष्ट्रवादीने ठिकठिकाणी पकोडे तळून आंदोलन केले. त्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील घाऊक वडे तळण्याची चर्चा रंगली.
सेनेची सहा हजार वड्यांची आॅर्डर, पकोडेवादामुळे रंगली खमंग चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 1:12 AM