ठाणे : मागील काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी ठाणे विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या आठ आगारांतील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपाची तीव्रता असतानाच कामगार न्यायालयाने सर्व कामगारांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे ठाणे विभागीय कार्यालयाकडून १४० कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासंदर्भातील नोटिसा बजावल्याची माहितीही एसटीचे ठाणे विभागीय नियंत्रक विनोदकुमार भालेराव यांनी शनिवारी दिली. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही २८ टक्के महागाई भत्त्याचा दर लागू करावा, वार्षिक वेतनवाढ २ वरून ३ टक्के मान्य केलेल्या तारखेपासून लागू करावी, तसेच सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र व राज्य शासनाने लागू केलेला घरभाडे भत्ता सुधारित दराने लागू करावा, या कृती समितीच्या मागण्या दिवाळीपूर्वीच प्रशासनाने मान्य केलेल्या आहेत. परंतु कर्मचारी हे विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असून गेले काही दिवसांपासून संपावर आहेत. ठाणे जिल्ह्यातील आठ आगारांतील सुमारे दोन हजार ७०० कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. या संपामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. त्यातच आता कामगार न्यायालयाने सर्व कामगारांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिल्याने कर्मचाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.
एसटी कामगारांना कामावर रुजू होण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 7:51 AM