ठाणे : जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे यांनी जिल्ह्यातील शहापूर तालुक्यासह अन्य तालुक्यांतील पाणीटंचाईग्रस्त गावांच्या समस्येवर मात करण्यासाठी ठिकठिकाणी तातडीने टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. जिल्ह्यातील नळ पाणीपुरवठा योजनाही कार्यान्वित करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
आटगाव ग्रामपंचायत (पेंढरघोळ) नळपाणी योजनेचे उद्घाटन लोणे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा, पशू, कृषी व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे, शहापूर पंचायत समिती सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. शहापूर तालुक्यातील घोळबन, कोठारे ग्रामपंचायत येथील थड्याचा पाडा, तेलपाडा, पाटोळपाडा, कोथळा, तळवाडा, ढेंगणमाळ आदी ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींसह त्यांनी टंचाईग्रस्त गावांचा दौरा केला.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विविध घरकुल योजनेतर्गंत पक्क्या घरांचे बांधकाम सुरू आहे. लाभार्थ्यांना घर बांधताना लागणारी साधनसामग्री एकाच छताखाली मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत कल्याण येथील ग्रामपंचायत बेहरे बहुउद्देशीय केंद्र इमारतीत महिला उद्योजक समूह स्थापन करून शाश्वत घरकुल मार्ट उभारले आहे. त्याचे उद्घाटनही लोणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्वेता पालवे, सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामस्थ आणि बचत गटातील महिला उपस्थित होत्या.