कल्याण : डोंबिवलीतील सर्पमित्र भरत केणो या सर्पमित्रला सर्पदंश झाल्यावर त्याला उपचारासाठी महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याच्यावर उपचार न करता त्याला पुढील उपचारासाठी अन्य सरकारी रुग्णालयात नेण्याचा सल्ला देत उपचारात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी डॉ. प्रशांत चौधरी याला निलंबित करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी प्रशासनास दिले आहेत.
महापालिकेच्या रुग्णालयात सामान्य नागरीक उपचासाठी येतात. त्यांना योग्य प्रकारे उपचार मिळत नाही. त्यांची तपासणी न करताच त्यांना पुढील उपचारासाठी कळवा येथील सरकारी रुग्णालयात किंवा मुंबईतील केईएम व जे. जे. रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला जातो. त्याचाच प्रत्यय सर्पमित्र केणो यांना आला. त्यांना उपचारासाठी नेले असता त्यांना उपचार न करता एक तास ताटकळत ठेवले. त्यानंतर पुढील उपचारासाठी अन्यत्र हलविण्याचा सल्ला दिला. वेळिच उपचार न मिळाल्याने केणो याचा मृत्यू झाला. नागरीकांच्या जिविताशी डॉक्टर व नर्स खेळतात. हा कुठला प्रकार याविषयी सभापतींनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. एका रिक्षा चालकालाही पिसाळलेला कुत्र चावला होता. त्यालाही रेबिजचे इंजेक्शन असून देखील दिले गेले नाही. याबाबत मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता रोडे यानी काय कारवाई केली. त्यांचे या सगळ्य़ा गैर गोष्टीवर वचक नाही. नियंत्रण नाही. रुग्णालयावर वर्षाला कोटय़ावधी रुपये खर्च केले जाता. तरी देखील नागरीकांना उपचार मिळत नाही. ते जिवानिशी जात आहेत. रुग्णालयात औषधे असून देखील रुग्णाना बाहेरुन औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो. उपचारासाठी आलेल्या रुग्णांची हकालपट्टी करणा-या डॉक्टरांची हाकालपट्टी करा असा आदेश सभापतींनी दिला. सभापतींच्या सत्यकथनाला सदस्य विकास म्हात्रे यांनी दुजोरा दिला. त्यांना देखील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी ते स्वत: गेले असता असाच अनुभव आला. त्याठिकाणच्या नर्सने औषध आहे. ते कपाटात लॉक करुन ठेवले आहे. त्याची चावी नाही असे उत्तर म्हात्रे यांना दिले.
रुग्णालयातील औषधे रुग्णाना न देता बाहेर विकली जातात असा आरोपही सभापतींनी यावेळी केला. सदस्याला अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य रुग्णांची काय अवस्था असेल असा प्रश्न यातून अन्य सदस्यांनी उपस्थित केला. या सगळया प्रकरणास डॉ. रोडे या देखील तितक्याच जबाबदार असल्याचा मुद्दा सभापतींसह सदस्यांनी उपस्थित केला.