ठाणे : रस्ते अपघातातील घटनेत मृत्यूच्या प्रमाणात दिवसन दिवस वाढ झालेली दिसून येत आहे. या आळा घालून अपघाती मृत्यू टाळण्यासाठी जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी विविध विभागात कार्यरत असलेल्या व दुचाकी चालवणाऱ्यां सर्व कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरण्याची सक्ती करणारे आदेश ठाणेजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केले आहेत. यामुळे मनमानी दुचाकी चालवणाऱ्यां कर्मचाऱ्यांचे आता धाबे दणाणले आहे.जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळां, कॉलेज व सर्व शासकीय यंत्रणांच्या कार्यालयात काम करणारे अधिकारी, कर्मचारी जे दुचाकी वाहनाचा वापर करतात त्यांना मोटर वाहन अधिनियम अन्वये हेल्मेट घालणे सक्तीचे करणारा आदेश ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आता जारी केला आहे. त्यांनी हेल्मेट वापरण्याचा आदेश ९ जानेवारीपासून जिल्ह्यात लागू केला आहे. या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येताना अथवा कोणत्याही कामासाठी दुचाकी वाहन वापरताना हेल्मेट घातलेले नसल्यास तो अधिकारी व कर्मचारी हा मोटर वाहन अधिनियम १९८८ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र ठरविण्यात येणार आहे. याशिवाय मोटर वाहन अधिनियमाचे उल्लघन केल्यास त्यांची गंभीर नोंद घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमुद केले आहे.उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी देखील दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट घालणे सक्तीचे असल्याचे वेळोवेळी निर्णय दिलेले आहेत. जिल्ह्यात केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहसह राज्य रस्ता सुरक्षा पंधरवडा देखील साजरा होता. मात्र तरी देखील जिल्ह्यात रस्त्यावरील अपघाती मृत्यूच्या प्रमाणात दिवसन दिवस वाढ होताना दिसून येत आहे. त्यात घट करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समिती अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील दुचाकी वाहन चालक सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्याची सक्ती करणारा आदेश जारी केला आहे. यामुळे रस्त्यावरील अपघाती मृत्युच्या प्रमाणात दिवसन दिवस होत असलेली वाढ कमी होईल आणि जिल्ह्यातील अपघातात घट होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.