- धीरज परबमीरारोड - मीरा भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत लागलेले फटाके विक्री स्टॉल उच्च न्यायालयाचे आदेश आणि शासन निर्देशा प्रमाणे आहेत कि नाही ? याची चौकशी करण्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारींना सांगण्यात आले आहे . फटाके वाजवून न्यायालय आदेश व शासन अधिनियमचे उल्लंघन करून ध्वनी व वायू प्रदूषणचा लोकांना त्रास देणाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यास पोलीस ठाण्यांना सांगण्यात आले आहे . पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी गांभीर्याने दखल घेत कारवाईचे आदेश दिल्याने आता ठोस कारवाई होईल अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे .
कमी उत्सर्जन असलेले फटाके व केवळ हिरवे फटाके यांची निर्मिती व विक्री करण्यात यावी असं सांगण्यात आले असून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि घनकचऱ्याचा समस्या निर्माण करणाऱ्या फटाक्यांच्या निर्मिती व विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्याचबरोबर फटाक्यांमध्ये बेरियम क्षारांचा वापर करण्यास बंदी आहे. फटाक्यांच्या वापरामुळे होणारे हानिकारक परिणाम याची माहिती सर्वसामान्य जनतेस सहज उपलब्ध आहे .
फटाक्यांची निर्मिती, वाहतूक, विक्री व वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाची बंदी असून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. फटाके वाजविण्याकरता वेळ देखील निश्चित करण्यात आलेली आहे. सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी आपापल्या हद्दीमध्ये फटाके विक्री करणाऱ्या स्टॉल धारकांकडून न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांची फटाके विक्रेते पूर्तता करत आहेत किंवा नाही याची व्यक्तिशः दखल घेऊन कार्यवाही करावी. फटाके निश्चित दिलेल्या वेळेतच वाजवले जातील याची खबरदारी घ्यावी. अवेळी फटाके फोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा असे निर्देश पोलीस ठाणे प्रभारींना दिल्याची माहिती पोलीस आयुक्तालयातून मिळाली आहे.
मीरा भाईंदर व वसई विरार शहरात रात्री उशीरा पर्यंत मोठ्या प्रमाणत वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके वाजवण्यात येत असल्याने कारवाईची मागणी होत आहे . तर शहरात बेकायदा फटाके विक्री स्टॉल मोठ्या प्रमाणात लागलेले असून या मुळे भीषण दुर्घटना घडण्याची भीती असल्याने त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी अश्या तक्रारी आहेत . त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी दिलेल्या आदेशा मुळे ठोस कारवाई होईल अशी आशा नागरिकां कडून व्यक्त होत आहे.
लोकमत ऑनलाईन ने शहरातील बेकायदा फटाका विक्री स्टॉल व मनमानीपणे वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यां मुळे लोकांना होणारा त्रास तसेच वायू आणि ध्वनी प्रदूषण वाढल्याचे वृत्त दिले होते . त्याची दखल घेत आता कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.