ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह दहा निरीक्षकांच्या आयुक्तालयाच्या बाहेर बदल्यांचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी हे आदेश काढले असून कालावधी पूर्ण झाल्याने रविवारपासून या निरीक्षकांना ठाणे शहरमधून कार्यमुक्त केल्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त दत्तात्रेय कांबळे यांनी काढलेल्या आदेशानुसार वरिष्ठ निरीक्षकांमध्ये विष्णुनगर पोलीस ठाण्याचे संजय साबळे यांची ठाणे ग्रामीणमध्ये, निजामपुरा पोलीस ठाण्याचे विजय डोळस यांची रायगड, तर भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे सुभाष कोकाटे यांची नवी मुंबईत बदली झाली आहे. याशिवाय, अंबरनाथ वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांची नाशिक शहर, उल्हासनगरच्या वाहतूक शाखेचे श्रीकांत धरणे यांची नवी मुंबईत, भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे अजय कांबळे यांचीही नवी मुंबईत तर गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट तीन उल्हासनगरचे संजू जॉन यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली झाली आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्याचे रमेश जाधव यांची नवी मुंबईत, कापूरबावडी पोलीस ठाण्याचे संजय पाटील यांची रायगड आणि गुन्हे शाखेच्या निरीक्षक सुवर्णा अडसुळे यांची मुंबई शहर आयुक्तालयात बदली झाली आहे. प्रभारी अधिकारी यांनी या निरीक्षकांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेशही बजावण्यात आले आहेत.
* वर्षभरातच जनसंपर्क अधिकाऱ्याची बदली
वर्षभरापूर्वी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) सुखदा नारकर यांची मुंबईत बदली झाली होती. त्यांचा अतिरिक्त पदभार गुन्हे शाखेच्या एमपीडीए विभाग सांभाळणाऱ्या निरीक्षक सुवर्णा अडसुळे यांच्याकडे सोपविला होता. ठाणे आयुक्तालयातील कार्यकाळ पूर्ण झाल्याने अडसुळे यांचीही आता बदली मुंबईत झाली आहे. मात्र, त्यांचा पीआरओचा पदभार अद्याप कोणाकडेही सोपविलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.