ठाणे : संततधार पावसामुळे शहरात खड्डे पडल्याच्या तक्रारी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी बुधवारी शहरातील खड्ड्यांची पाहणी करून तातडीने खड्डे भरण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले. खड्डे भरण्याचे काम सुरू झाले नाही, तर संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला.शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, लोकमतने काही दिवसांपूर्वीच या ज्वलंत समस्येवर प्रकाशझोत टाकला होता. त्यानंतर आयुक्तांनी बुधवारी सकाळपासूनच शहरातील खड्ड्यांची पाहणी करायला सुरुवात केली. या दौऱ्यांतर्गत त्यांनी दालमिल चौक येथील रस्त्याची पाहणी करून एका बाजूला राहिलेल्या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे. हे काम तातडीने सुरू न झाल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी नगरसेवक एकनाथ भोईर उपस्थित होते. दालमिल चौकानंतर आयुक्तांनी एम्को कंपनी येथील रस्त्याची पाहणी करून अर्धवट काम तसेच चेंबर कव्हर्स तातडीने बसविण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर तीनहातनाका, कशीश पार्क, तसेच तीनहातनाका ते लुईसवाडी येथील सर्व्हिस रोडची पाहणी करून खड्डे तातडीने भरण्याचे आदेश दिले.
शहरातील खड्डे तातडीने भरण्याचे दिले आदेश, आयुक्तांकडून पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 12:49 AM