कल्याण : केडीएमसी हद्दीत सध्या कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढत असताना, उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यात आरोग्याला हानिकारक असलेला जैविक कचराही सर्रासपणे टाकला जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कल्याण पूर्वेकडील महात्मा फुलेनगर परिसरात आढळलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये हा कचरा मोठ्या प्रमाणात दिसून आला.
केडीएमसी सध्या शून्य कचरा मोहीम राबवित आहे. याअंतर्गत नागरिकांना ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करणे बंधनकारक आहे. जैविक कचरा संकलनासाठी मनपाने विशेष कंत्राट दिले आहे. परंतु, जैविक कचरा उघड्यावर पडलेल्या कचऱ्यात आढळून येत आहे. कल्याणच्या महात्मा फुलेनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून साठलेल्या कचऱ्यात औषधे, इंजेक्शन्स व इतर जैविक कचरा मोठ्या प्रमाणात आढळत आहे. हा कचरा गुरुवारी दुपारी उचलण्यात आला. धक्कादायक म्हणजे हा कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची कोणतेही साधने पुरविलेली नसल्याचेही समोर आले.
दरम्यान, हा कचरा गोळा करण्यासाठी कंत्राटदार नेमला असताना, जैविक कचरा उघड्यावर कसा टाकला जातो? हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. नागरिकांकडून असा कचरा उघड्यावर टाकला जातोय का? अशीही शंका असून, मध्यंतरी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात केलेल्या दंडात्मक कारवाईच्या मोहिमेचे काय झाले? याकडेही लक्ष वेधले जाते आहे.
-----------------