- प्रज्ञा म्हात्रेठाणे : ठाणेकरांना विविध संमेलनांची मेजवानी अनुभवण्यास देणाºया सांस्कृतिकनगरीत आता आणखीन एका संमेलनाची भर पडत आहे. १०० वर्षे पूर्ण करणा-या महाराष्ट्रातील ग्रंथालयांचे एकदिवसीय संमेलन ठाण्यात १ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे वाचनसंस्कृतीच्या प्रेमींकरिता नवी पर्वणी उपलब्ध होणार आहे.८४ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन, ९६ वे अ.भा. मराठी नाट्य संमेलन, युवकांसाठी बहुभाषिक साहित्य संमेलन, २९ वे अ.भा.स्वा. सावरकर साहित्य संमेलन, विज्ञान साहित्य संमेलन, ३१ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन, आठवे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन, पहिले अ.भा. सीकेपी साहित्य संमेलन, नववे ठाणे जिल्हा मराठी साहित्य संमेलन अशी विविध संमेलने ठाण्यात पार पडली. यातील साहित्य संमेलनाचे यजमानपद मराठी ग्रंथसंग्रहालयाकडे होते. डिसेंबर २०१० मध्ये साहित्य संमेलन पार पाडल्यानंतर मराठी ग्रंथसंग्रहालयाने जानेवारी २०१७ मध्ये युवा संगम आयोजित केला होता. संस्थेच्या १२५ व्या वर्षपूर्तीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे, उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये ग्रंथालयांचे संमेलन हे आगळेवेगळे संमेलन मराठी ग्रंथसंग्रहालय आयोजित करत आहे. महाराष्ट्रातील ज्या ग्रंथालयांनी आपले शतक पूर्ण केले आहे, त्या ग्रंथालयांचा या संमेलनात सहभाग असणार आहे. शतकभराची वाटचाल केलेल्या ग्रंथालयांची संख्या सुमारे ९० आहे. १ एप्रिल रोजी मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात दिवसभर हे संमेलन असणार आहे. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिकांच्या हस्ते तर समारोप सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या ग्रंथालयांच्या समस्या, त्यांचे उपक्रम जाणून घेतले जाणार आहेत. तसेच, त्यांच्या १०० वर्षांच्या वाटचालीचा आढावाही घेतला जाणार आहे.येत्या १ जून रोजी मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने वर्षभर घेण्यात आलेल्या कार्यक्रमांचा समारोप गडकरी रंगायतन येथे होत आहे. या समारोपाला राज्यपाल उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
१०० वर्षे पूर्ण केलेल्या ग्रंथालयांचे ठाण्यात संमेलन, १ एप्रिलला आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 2:52 AM