भिवंडी - २४ व २५ फेब्रुवारी रोजी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जिल्ह्यामध्ये नमो महारोजगार कोकण विभागीयस्तरीय मेळाव्याचे आयोजन हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे येथे करण्यात येणार असल्याची माहिती भिवंडी मनपा आयुक्त अजय वैद्य यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
हा रोजगार मेळावा महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला असून जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी प्रथम उद्योजकांनी आपली नोदंणी सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी पर्यंत करणे आवश्यक आहे.भिवंडी महापालिकेत यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार असून शनिवार व रविवार अशा सुट्टीच्या दोन दिवसात देखील या विशेष कक्षात नमो महा रोजगार मेळाव्यासाठी तरुणांची नोंदणी होणार आहे.तरी जास्तीत जास्त तरुणांनी हा महा रोजगार मिळावा दे म्हणजे देशभक्तीचे काम आहे अशा उद्देशाने या मेळाव्यात सहभागी व्हावे व आपला रोजगार निश्चित करून घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त अजय वैद्य यांनी भिवंडीतील तरुणांना केले आहे.
नमो महारोजगार मेळाव्याकरिता ३ फेब्रुवारी २०२४ पर्यंत १३ आस्थापनेतर्फे २ हजार ६०३ रिक्त पदे अधिसूचित करण्यात आली असून रोजगार मेळाव्याच्या आयोजनाच्या दृष्टीकोनातून कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी,महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय तसेच उद्योग व कामगार विभाग यांना विविध कंपन्याशी संपर्क साधून रिक्त पदे अधिसूचित जाहीर करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.यामध्ये व्यापारी,उद्योजक,यांनी कुशल उमेदवार मिळण्यासाठी वर नमूद पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असून त्यांना मदत करण्यासाठी पालिकेत शनिवार, रविवार रोजी पोर्टल भरणेकामी तांत्रिक मदत पथक तयार करण्यात येणार असून, सकाळी १० ते ५ या दरम्यान महानगर पालिका तळ मजला येथे संपर्क साधावा, असे आवाहन पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी केले आहे.
यावेळी अतिरीक्त आय़ुक्त संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, मुख्यालय उपायुक्त दीपक झिंजाड,समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त प्रणाली घोंगे, सर्व विभाग प्रमुख विविध तसेच उद्योग पुरविणा-या संस्था डाईंग,सायझिंग, मोती कारखाने, आयटीआय, टोंरट पॉवर, अमेझान,इत्यादींसहर तसेच औद्योगिक संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, आदि मान्यवर उपस्थित होते.