- नितीन पंडितभिवंडी - एक जानेवारी पासून पोलिस दलातर्फे वर्धापन दिनी निमित्त रायझींग डे सप्ताह साजरा केला जातो .ज्यामध्ये नागरिकांमध्ये जाऊन विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती प्रबोधन व शाळकरी विद्यार्थ्यांना पोलिस दलाबद्दल माहिती देण्याचे उपक्रम राबविले जातात.भिवंडी पोलिस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी पोलीस रेझिंग डे निमित्ताने स्व.आनंद दिघे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान शांतता समिती,कौमी एकता समिती सदस्य यांच्या उपस्थितीत शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीमध्ये पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे, आमदार महेश चौघुले, पालिका आयुक्त अजय वैद्य यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते,वकील संघटनांचे पदाधिकारी,सेवा निवृत्त सैनिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, शांतता समिती सदस्य,महिला दक्षता कमिटी, पोलीस मित्र व शहरातील हिंदू मुस्लिम धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या नेतृत्वाखाली स्वामी विवेकानंद इंग्लिश हायस्कूल सुभाष नगर या शाळेतील विद्यार्थी,विद्यार्थिनी यांची महिला सुरक्षिता व वाहतूक सुरक्षितते साठी रॅली काढण्यात आली.सदर रॅली सुभाष नगर येथुन सुरू होवून सुभाष नगर पोलीस चौकी येथे समाप्त झाली.त्यानंतर उपस्थित पोलीस अंमलदार यांनी महिला सुरक्षिततेबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.तर गोपाळ नगर येथील डी डी दांडेकर विद्यालय येथील विद्यार्थी विद्यार्थिनींना पोलीस ठाण्यात आणून त्यांना पोलीस ठाणेतील शस्त्रांची तसेच कामकाजा बाबत माहिती देवून मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमात नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कामत यांच्या नेतृत्वाखाली अंजुरफाटा येथील महादेव बाबुराव चौगुले महाविद्यालय येथे सायबर क्राईम तसेच महिला सुरक्षा या विषयी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमात पोलिस हवालदार विजय सोनवणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सायबर क्राईम संदर्भात उपयुक्त मार्गदर्शन केले.तर महिला पोलिस उपनिरीक्षक सोनाली पाटील यांनी सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून महिला सुरक्षा संदर्भात विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.निजामपूर पोलिस ठाणे क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज चौकात पथनाट्याद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांना विद्यार्थ्यांसह नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.