मीरा रोड : अवयवदानाच्या जनजागृतीसाठी रविवार १ ऑक्टोबर रोजी मीरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात आयोजित कार्यशाळेत २०० नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प केला. मरणोत्तर अवयदानामुळे अन्य कोणीतरी हे सुंदर जग पाहू शकेल ही संकल्पना जनमानसात रुजविण्यासाठी महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला लायन्स क्लब ऑफ भायंदरच्या सहकार्याने मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात कार्यशाळा आयोजित केली होती.अवयवदानाची मोहिम तळागाळापर्यंत पोहचण्याकरिता काय करणे गरजेचे का आहे? श्रीलंकेत मानवी अवयव ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून ग्राह्य धरली जाते, त्याच धर्तीवर भारतात असा कायदा करणे गरजेचे आहे का?अवयवदानाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची नेमकी कारणे कोणती? अशा अनेक विषयांवर चर्चा झडली .कार्यशाळेत मीरा भाईंदर , नालासोपारा व वसई विरार येथील दोनशे हुन अधिक नागरिकांनी भाग घेतला होता. आपल्या संस्कृतीत दानाला अनन्यसाधारण महत्व आहे, त्या भारतीय संस्कृतीला अंधश्रद्धा नामक अविचारी भावनेने ग्रासून टाकले आहे. अवयवदान हे श्रेष्ठ दान असले तरी लोकांना याबाबत फारशी कल्पना नसल्याचे जाणवते व याच कारणास्तव अवयवदानाला हवा तसा प्रतिसाद जनसामान्यांतून मिळत नाही, असे प्रांजळ मत किडनी विकार तज्ञ डॉ. महेश प्रसाद यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित २०० नागरिकांनी अवयव दानाचा संकल्प करून याविषयी अधिक जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.गेल्याच आठवडयात वसई येथील ७९ वर्षीय ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी अवयव दानाचा निर्णय घेतला होता व यामुळे दोन नागरिकांचे प्राण वाचले होते याची माहिती उपस्थित नागरिकांना देण्यात आली. योग्य प्रमाणात अवयवदान होत नसल्याने आजही कित्येक जण हे विविध अवयवाच्या प्रतीक्षेत आहेत. कुटुंबप्रमुखाच्या सुज्ञ व प्रभावी प्रबोधनातून अन्य सर्वच सदस्यांना अवयवदानासाठी निश्चितच प्रवृत्त करता येऊ शकते. व त्यासाठी समाजाची मानसिकता ही अशाच प्रबोधनातून निश्चितपणे बदलता येईल अशी माहिती रवी हिरवाणी यांनी दिली.एका माहितीनुसार देशात दरवर्षी यकृताच्या आजारामुळे दोन लाख, किडनी प्रत्यारोपणाअभावी दीड लाख तर ५० हजार लोक हृदयरोपण शक्य न झाल्याने मरण पावतात. दृष्टिदोषामुळे अंधत्व आलेले आणि प्रत्यारोपणाची वाट पाहणारे किमान दहा लाख लोक आपल्या देशात आहेत. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे नऊ जणांना जीवनदान मिळू शकते, याबाबत सर्वानी विचार करून यासाठी पुढचे पाऊल उचलले पाहिजे. अफाट लोकसंख्या असलेल्या आपल्या भारत देशात अवयवदानाबाबत जागरूकता आणणे हे प्रत्येक रुग्णालयाचे कर्तव्य आहे अशी माहिती उपस्थितांना देण्यात आली .
मीरा रोड येथे 200 नागरिकांनी अवयवदानाचा केला संकल्प, वोक्हार्ट रुग्णालयात कार्यशाळेचं आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2017 4:26 PM