कुमार बडदे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंब्रा : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात बुधवारी मुंब्य्रात निघालेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येनी लोक सहभागी झाले होते. तरुणांची संख्या लक्षणीय होती. मोर्चातील गर्दी इतकी वाढली की, त्यामुळे आयोजकही हबकून गेले. मोर्चा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार रेल्वे स्थानकापर्यंत न नेता जैन मंदिराशेजारील मैदानावर विसर्जित करण्याकरिता आयोजक व पोलीस यांचे प्रयत्न सुरु होते. मात्र मोर्चेकऱ्यांची आक्रमकता पाहता त्यांना रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यापासून रोखल्यास कदाचित मोर्चाला हिंसक वळण लागू शकते, अशी भीती वाटल्याने मोर्चा पुढे जाऊ देण्यात आला.कुल जमातने काढलेल्या या मोर्चात जवळपास ४० हजार नागरिक सहभागी झाले होते, असा आयोजकांचा दावा आहे. यामध्ये तरुणांची संख्या अधिक होती. त्यांनी विविध घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध नोंदवला. आपल्या मागण्यांचे निवेदन यावेळी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांना देण्यात आले.आयोजकांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन कौसा, संजयनगर, आनंद कोळीवाडा, तसेच रेल्वेस्थानकाजवळील प्रमुख बाजारपेठेतील दुकाने, हॉटेल्स बंद ठेवली होती. या आंदोलनास काही भागांत हिंसक वळण लागल्याच्या पार्श्वभूमीवर मुंब्य्रातील मोर्चासाठी वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.डोंबिवलीत विधेयकाचे जोरदार समर्थन,अभाविपचे कार्यकर्ते एकवटलेडोंबिवली : नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ डोंबिवलीत महाविद्यालयीन विद्यार्थी एकवटल्याचे चित्र बुधवारी दिसले. कायद्याच्या समर्थनासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घरडा सर्कल येथील शहीद कॅ. विनय सच्चान स्मारकाजवळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याला मानपाडा पोलिसांनी अगोदर दिलेली परवानगी नंतर नाकारण्यात आली.विद्यार्थ्यांनी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फडके पथ येथे एकत्र येत कायद्याच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झालेल्या नागरिकता सुधारणा विधेयकातील तरतुदी, त्याबद्दल समाजात पसरवले जाणारे गैरसमज, त्यामुळे समाजाचे होणारे नुकसान इत्यादींची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली.देशात केवळ २० विद्यापीठांत निदर्शने होत आहेत. काही समाजकंटक हिंसा पसरवत असल्याचा आरोप डोंबिवली शहरमंत्री अलोक तिवारी यांनी केला. यावेळी १५० विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हा संघटनमंत्री प्रेरणा पवार, महाविद्यालय विद्यार्थीप्रमुख नितीन पाटील, जिल्हा विद्यार्थिनीप्रमुख श्रेया कर्पे, देवेश बाबरे, मिहिर देसाई आणि अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.
चार तास वाहतूक ठप्पमुंब्य्रातील नागरी वसाहतीमधून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र मांक-४ च्या एकेरी मार्गावरून मार्गक्र मण करत असलेला मोर्चा पोलीस ठाण्यासमोर पोहोचल्यानंतर मोर्चेकरी दोन्ही रस्त्यांवर पांगले. त्यामुळे दीड तासाहून अधिक काळ राष्ट्रीय महामार्ग क्र मांक-४ वरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. याचा फटका कर्तव्य बजावण्यासाठी चाललेल्या अग्निशमन दलाच्या वाहनालाही बसला. अग्निशमन दलाची गाडी ठाकूरपाडा परिसरातील रस्त्यावर बराच वेळ एकाच ठिकाणी उभी होती.
आंदोलकांच्या संख्येचा अंदाज चुकलामोर्चाला उपस्थित राहणाºया मोर्चेकऱ्यांच्या संख्येबाबत आयोजकांचा अंदाज चुकला. आंदोलकांची प्रचंड संख्या बघून त्यांची तारांबळ उडाली. त्यामुळे पूर्वनियोजित घोषणेनुसार मोर्चा रेल्वेस्टेशनजवळ न नेता तो पोलीस ठाण्यासमोरील जैन मंदिराच्या मैदानात संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी घोषणा नगरसेवक अशरफ पठाण आणि मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शमीम खान वारंवार करत होते. परंतु, त्यांच्या या घोषणांना प्रतिसाद न देता मोर्चेकºयांनी स्टेशनच्या दिशेने कूच केले. आयोजक जैन मंदिराजवळ मोर्चा संपवण्याच्या अटीवर कायम राहिले असते, तर अस्थिरता माजून आंदोलनाला गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली होती.