राजू काळे भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेमार्फत गांधी जयंतीच्या निमित्ताने सोमवारी शहरात स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पालिकेने स्वच्छतेसाठी निश्चित केलेल्या तारांकित मानांकनानुसार एकूण ४१ गृहनिर्माण संस्थांसह १५ शाळांची निवड करण्यात आली. त्यांना महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
स्वच्छता रॅलीला नवघर येथील मैदानातून सकाळी ९ वाजता सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी महात्मा गांधींच्या प्रतिमेला महापौरांनी पुष्पमाला अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर आयुक्तांनी सर्व उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. रॅलीला पालिकेच्या सहा प्रभागांतर्गत सुरुवात करण्यात आली. त्यात नागरिकांसह विविध संघटनांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला बचतगटाचे सदस्य, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. तसेच पालिकेतील बहुतांशी अधिकारी व कर्मचा-यांनी रॅलीत सहभाग घेऊन त्याचे नियोजन केले. रॅलीद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्यात येऊन ओला व सुका कच-याचे वर्गीकरण करण्यासह ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचे तसेच उघड्यावर शौचाला न बसणे व परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी दर आठवड्यातून २ तास तर वर्षभरात १०० तास श्रमदान करण्याचा संकल्प केला. २ आॅक्टोबर २०१४ मध्ये सुरु झालेल्या स्वच्छता अभियानाला यंदा तीन वर्षे पूर्ण होत असून शहरातील स्वच्छतेसाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे आयुक्तांनी उपस्थितांना याप्रसंगी सांगितले. त्यासाठी नागरीकांनी स्वत:हून पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी कुठेही अस्वच्छता आढळल्यास नागरिकांनी उपलब्ध मोबाईल अॅपवर माहिती द्यावी अथवा थेट पालिकेकडे तक्रार द्यावी, असे आवाहन केले. रॅलीत नगरसेवक, नगरसेविकांसह सभागृह नेता रोहिदास पाटील, पालिका उपायुक्त विजयकुमार म्हसाळ, दीपक पुजारी, डॉ. संभाजी पानपट्टे, मुख्य लेखाधिकारी शरद बेलवटे, सहाय्यक लेखाधिकारी सुरेश घोलप, शिक्षणाधिकारी सुरेश देशमुख आदींनी सहभाग घेतला होता.