ठाणे - श्री जगन्नाथ कल्चरल एज्युकेशन ट्रस्टतर्फे श्री जगन्नाथ रथयात्रा व बाहुहायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने भगवान श्री जगन्नाथ रथयात्रा उत्सवाचे आयोजन केले आहे अशी माहिती गुरुवारी गडकरी रंगायतन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या निमित्ताने ठाणेकर रहिवाशांना जगन्नाथपुरी सारख्या रथयात्रेचा अनुभव घेता येणार आहे. यावेळी प्रशांत कुमार पटनाईक,परशुराम लेंका,दत्ता घाडगे आदी यावेळी उपस्थित होते .श्री जगन्नाथ रथयात्रा १४ जुलै रोजी २. ३० वाजता मनोरमा नगर येथील शनिमंदिर पासून जगन्नाथ रथयात्रेस प्रारंभ होणार असून, रथयात्रा आर मॉल, मानपाडा नाका, हपी वैली, खेवरा सर्कल, गांधी नगर , वसंत विहार , उपवन तलाव येथे जाऊन पालाई देवी मंदिर येथे या रथयात्रेची समाप्ती होणार आहे. तर बाहुडा यात्रेस २२ जुलै रोजी ३ वाजता पालाई देवी मंदिर येथून प्रारंभ होणार असून उपवन , गांधीनगर , माजिवडा , हायलँड , ढोकाळी ,मनोरमा नगर येथे येथे यात्रेची समाप्ती होणार आहे. या निमित्ताने १५ जुलै ते २१ जुलै या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा २० जुलै रोजी मराठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली . हा उत्सव साजरा करण्याचे ट्रस्टचे दहावे वर्ष असून, गेल्यावर्षी जवळपास २० हजार भक्त या उत्सवात सहभागी झाले होते . ट्रस्टचा उद्देश समाजातील विविध स्तरातील लोकांना एकत्र करून उत्सव साजरा करणे हा असल्याचे मोहांती यांनी सांगितले. या रथयात्रेच्या माध्यमातून ओडिशी संस्कृतीचे दर्शन ठाणेकरांना घेता येणार आहे.