ठाणे : महाराष्ट्र पोलिसांच्या रेझींग डे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. २ ते ८ जानेवारी दरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात येणार असून ठाणे नगर पोलिसांच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त अविनाश अंबरे, सहाय्यक पोलीस आयुक्त नीता पडवी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सुर्यवंशी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात रविवारी बँड वादनाने झाली. शिवाजी मैदानाबाहेर ठाणे पोलीस बँड पथकाने हे वादन केले.
दरम्यान, या सप्ताहामध्ये ग्राहक जनजागृती, गुन्हेविषयक जनजागृती, रॅली, शस्त्रांचे प्रदर्शन, ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या विविध गुन्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमालाचे हस्तांतरण करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.