मीरा रोड - हे दीदी या संस्थेच्या माध्यमातून शहरातील महिला व तरुणींना दुचाकी चालवणे , रोजगार तसेच आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आॅनलाइन वस्तू विक्री करणा-या कंपन्यांकडून रोजगार उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती माजी महापौर गीता जैन यांनी दिली.रेवती अय्यर यांची हे दीदी संस्था तर जैन यांचे अस्त्र फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शहरातील महिला, तरुणींसाठी रोजगार, स्वयंरोजगाराचे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. सुरुवातीला महिला व तरुणींना दुचाकी चालवण्यासह इंग्रजी संभाषण, गुगल मॅप आदींची हाताळणी याचे प्रशिक्षण मोफत दिले जाईल. इच्छुक महिला - तरुणीचे वय हे १८ वर्षांवरील असणे तसेच किमान ८ वी पास असणे आवश्यक आहे. दुचाकी चालवण्याचा परवाना काढून देण्यासाठी देखील संस्था सहकार्य करेल.प्रशिक्षणानंतर इच्छुकांना दुचाकीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. विजेवर चालणारी दुचाकी घेतल्यास त्यात ८ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. आॅनलाइन कंपन्यांच्या वस्तू घरपोच करण्यासाठीचे काम महिलांना सवडीप्रमाणे मिळणार असून याशिवाय औषध पुरवठादारांमार्फत देखील महिलांना रोजगार देण्याबद्दल चर्चा सुरू असल्याचे गीता जैन म्हणाल्या.
हे दीदी या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रमांचं आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 2:59 PM