जितेंद्र कालेकरठाणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदीखत तयार करून सुमारे १०९ गुंठे जमीन भलत्याच व्यक्तींच्या नावावर झाल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महसूल विभागाने संबंधित जमिनीचा सातबारा मूळ जमीनमालकाच्या नावावर करून तशी फेरफार नोंदही केली आहे. याबाबतचे पत्र मूळ जमीनमालक रामदास पाटील यांना देसाईगावच्या तलाठी सपना चौरे यांच्यामार्फत गुरुवारी देण्यात आले. शासनाने केलेल्या या कार्यवाहीबद्दल त्यांनी ‘लोकमत’सह महसूल अधिकाऱ्यांचेही आभार मानले आहे.बनावट कागदपत्रांच्या आधारे जितेंद्र देशमुख (रा. डोंबिवली) आणि सुनंदा वाघमारे (रा. मीठबंदर रोड, ठाणे) यांच्यासह आठ जणांनी रामदास पाटील यांची सुमारे १०९ गुंठे जमीन हडपली होती. याप्रकरणी मार्च २०१८ मध्ये डायघर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. त्यामुळे पोलीस आणि महसूल विभागाकडून स्वतंत्रपणे चौकशी सुरू होती. पाटील यांनी पोलीस आणि महसूल विभागाकडे फेºया मारूनही त्यांना दाद दिली जात नव्हती. याबाबतचे सविस्तर वृत्त ‘चक्क १०९ गुंठे जमीन लाटली’, ‘आठ जणांविरुद्ध गुन्हा : बनावट दस्त आणि मृत व्यक्तीची स्वाक्षरी दाखवून केला व्यवहार’ या मथळ्याखाली ४ एप्रिल २०१८ च्या ‘लोकमत’, ‘हॅलो ठाणे’च्या अंकात प्रसिद्ध झाले होते. याच वृत्ताची दखल घेऊन ठाण्याचे प्रांताधिकारी सुदाम पाटील यांनी दुसºयाच दिवशी म्हणजे ५ एप्रिल रोजी १४६१ आणि १४६२ क्रमांकांचे फेरफार रद्द करून मूळ मालक पाटील यांच्यासह २५ जणांच्या नावाने सात-बारा करण्याचे आदेश दिले. त्यावर दहिसरचे मंडळ अधिकारी कुंदन जाधव यांनी देसाई गावच्या तलाठी सपना चौरे यांना त्यावर कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार, पाटील यांना कार्यालयात बोलावून गुरुवारी सायंकाळी जमीन त्यांच्या नावावर झाल्याचा सातबारा देण्यात आला.दरम्यान, ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेल्या यातील सुनंदा वाघमारे (तलाठ्याची पत्नी), जितेंद्र देशमुख (तलाठ्याचा मदतनीस), एकनाथ गोटेकर (मेहुणा), यशवंत शिंदे, फुलचंद पाटील आणि विश्वनाथ पाटील या सहा जणांचा जामीन अर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळला. तर, महसूल विभागाने तातडीने याप्रकरणी दखल घेऊन मूळ मालकाचा सात-बारा नावावर केल्याने देसाई गावचे तलाठी ए.एम. मिरकुटे यांचा मात्र अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे......................
‘‘मृत व्यक्तींच्या स्वाक्ष-या करून बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त बनवून जमीन दुस-याच्या नावावर झाल्याचे समजल्यानंतर १५ जानेवारी २०१८ रोजी डायघर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला. दोन महिन्यांच्या चौकशीनंतर याप्रकरणी १७ मार्च रोजी गुन्हा दाखल झाला. परंतु, २० दिवसांत कोणालाही अटक झाली नाही. ३ एप्रिल रोजी ‘लोकमत’मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच शासनाला जाग आली. त्यानंतर, उपविभागीय अधिकाºयांनी दखल घेऊन १०९ गुंठे जमीन मूळ मालकांना परत केली. त्याबद्दल महसूल अधिकारी आणि ‘लोकमत’चे आभारी आहोत.’’रामदास पाटील, पाटील, देसाई गाव, ठाणे
‘‘यातील आरोपींना शोधण्यासाठी दोन वेगवेगळी पथके तयार केली आहे. डोंबिवली आणि ठाण्याच्या कोपरी येथेही त्यांचा शोध घेण्यात आला. त्यांच्या घरांना टाळे होते. ते पसार झाले असले, तरी त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक केली जाईल.’’सुशील जावळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डायघर पोलीस ठाणे