अनगाव : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५च्या प्रकल्प आराखड्याप्रमाणेच भिवंडी शहरातून जाणाऱ्या मार्गाचे काम सुरू करावे, अशी मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी केली आहे. राज्याचे नगरविकासमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनभावनेचा आदर करावा, असे आवाहन कपिल पाटील यांनी केले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून होणारे राजकारण अनाकलनीय असल्याचे मत व्यक्त केले आहे.‘एमएमआरडीए’ने कापूरबावडी, बाळकुमनाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा, धामणकरनाका, गोपाळनगर, टेमघर, रांजनोली, गोवेगाव एमआयडीसी, कोनगावमार्गे कल्याण एपीएमसी असा मार्ग मूळ आराखड्यानुसार निश्चित केला होता. भिवंडीतील वंजारपट्टीनाका, गायत्रीनगरमार्गे मेट्रोमार्ग वळवण्याची मागणी करण्यात येत आहे. ती अव्यवहार्य आहे. मूळ मार्गाप्रमाणेच मेट्रोचे काम सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे खा. पाटील म्हणाले. भिवंडीतील नागरिकांनी मूळ आराखड्याप्रमाणे मेट्रोमार्गाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेला माझा पाठिंबा आहे. वर्षानुवर्षे प्रचलित असलेल्या भिवंडीकर प्रवाशांच्या मार्गावरच मेट्रो-५ चा मूळ आराखडा तयार केला आहे, असे मत खा. पाटील यांनी व्यक्त केले.>मेट्रोचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांनाच!ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचे श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे. त्यांनी मेट्रोला मंजुरी देऊन आपल्या कारकिर्दीतच निविदाही काढली होती. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. आता मेट्रोचे श्रेय घेण्याचे राजकारण सुरू आहे, असा टोला खा. पाटील यांनी लगावला. काही लोकांनी पोस्टरबाजी, बॅनरबाजी सुरू केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार येण्याआधीच तत्कालीन भाजप-शिवसेनेच्या युती सरकारने मेट्रोचे काम सुरू केले होते, याकडे खा. पाटील यांनी लक्ष वेधले.
मूळ आराखड्याप्रमाणेच भिवंडीतील मेट्रो ५ चा मार्ग हवा- कपिल पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 12:59 AM