ठाणे : रिक्षामध्ये विसरलेले ३.२५ लाख रुपयांचे दागिने ज्येष्ठ नागरिकास पोलिसांनी शनिवारी परत केले. चितळसर पोलिसांनी ही कामगिरी केली.डोंबिवली येथील सम्राट हॉटेलजवळच्या गंगेश्वर गंगा हाऊसिंग सोसायटीचे रहिवासी राजरत्नम अरूणमयनायक नाडर (६८) हे शनिवारी नातेवाईकांना भेटण्यासाठी ठाण्यात आले. ठाणे रेल्वे स्थानक भागातून सकाळी ११ वाजता ते पत्नीसोबत रिक्षाने पोखरण रस्ता क्रमांक २ वरील सुभाषनगरकडे जाण्यास निघाले. त्यांच्याजवळच्या कापडी बॅगमध्ये काही कपडे, मिठाई आणि सुमारे ३ लाख २५ हजार रुपयांचे दागिने होते. ११.४५ वाजताच्या सुमारास ते सुभाषनगरातील महाकाली डेव्हलपर्सच्या कार्यालयासमोर उतरले. त्यावेळी त्यांचे चुलत भाऊ यबनेश्वर नाडर यांच्या दोन मुली त्यांना घेण्यासाठी आल्या. रिक्षातून उतरल्यानंतर राजरत्नम नाडर आणि त्यांची पत्नी दोन्ही मुलींसोबत निघून गेल्या. घरी पोहोचल्यानंतर १२.३0 वाजताच्या सुमारास कापडी बॅग रिक्षातच विसल्याचे त्यांच्या लक्षात आले. नाडर कुटुंबियांनी लगेच महालक्ष्मी डेव्हलपर्सच्या कार्यालयाजवळ येऊन चौकशी केली असता, रिक्षा निघून गेल्याचे समजले.नाडर यांनी याप्रकरणी चितळसर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून लगेच तपास सुरू केला. चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांनी महालक्ष्मी डेव्हलपर्सच्या सीसी कॅमऱ्याचे फुटेज तपासले असता, नाडर यांनी ज्या रिक्षाने तपास केला त्या रिक्षाचा क्रमांक दिसला; मात्र तो अतिशय अस्पष्ट होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रयत्न करून विटावा येथील संतोष परशुराम आंबेडकर (६५) याचा शोध लावला. दागिने, कपडे आणि मिठाई असलेली नाडर यांची बॅग पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केली. हे दागिने तक्रारदार नाडर यांना परत करण्यात आले.चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण बनगोसावी, पोलीस उपनिरीक्षक पुष्पराज सुर्वे आणि सुधिर कदम आदींनी ही कामगिरी केली.रिक्षा चालक निर्दोषरिक्षामध्ये विसरलेले ३.२५ लाखांचे दागिने चालकाने प्रवाशास स्वत:हून परत करणे अपेक्षित होते. पोलिसांना याबाबत विचारणा केली असता, रिक्षा चालकाने प्रवाशाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. सुभाषनगरातील महालक्ष्मी डेव्हलपर्स कार्यालयाजवळ नाडर दाम्पत्यास सोडल्यानंतर रिक्षा चालक निघून गेला. मात्र रिक्षात बॅग असल्याचे लक्षात आल्यानंतर नाडर यांच्या शोधात तो घटनास्थळी आला. नाडर यांचा शोध न लागल्याने काही वेळाने त्याने पुन्हा या भागात येऊन प्रवाशांना शोधण्याचा प्रयत्न केला. महालक्ष्मी डेव्हलपर्सच्या सीसी कॅमेर्याच्या फुटेजमध्ये हे दिसत असल्याची माहिती चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांनी दिली.
रिक्षामध्ये विसरलेले ३.२५ लाखाचे दागिने डोंबिवलीच्या ज्येष्ठ नागरिकास परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 7:15 PM
डोंबिवलीचे एक वयोवृद्ध दाम्पत्य ठाण्यात आॅटोरिक्षामध्ये ३.२५ लाख रुपयांचे दागिने विसरले होते. चितळसर पोलिसांच्या प्रयत्नांमुळे या दाम्पत्यास त्यांचे दागिने परत मिळाले.
ठळक मुद्देचितळसर पोलिसांची कामगिरीसीसी कॅमेर्याच्या फुटेजचा आधारदागिन्यांचा तत्परतेने शोध