भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात बेकायदा बांधकामे करण्यात आघाडीवर असलेल्या ओस्तवाल बिल्डरच्या उमरावसिंह ओस्तवाल याने पालिकेचा बनावट बांधकाम मंजुरी नकाशा बनवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन देण्यास ठाणे न्यायालयाने नकार दिला. ओस्तवाल बिल्डरचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता तरी पोलीस त्याला अटक करणार का? असा सवाल नागरिक करीत आहेत.
भाईंदर पूर्वेच्या जेसल पार्क येथील ओस्तवाल ओरनेट या इमारतीचा विकासक उमराव ओस्तवाल याने पालिकेचे शिक्के असलेला बनावट बांधकाम मंजुरी नकाशा बनवून त्याआधारे गृहनिर्माण संस्थेची नोंदणी तसेच सदनिका व गाळ्यांची विक्री केल्याची तक्रार शिजॉय मॅथ्यू या फसवणूक झालेल्या तरुणाने केली होती. महापालिकेनेही या प्रकरणी २० मे रोजी नवघर पोलीस ठाण्यात ओस्तवालविरोधात फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतरही नवघर पोलीस मात्र या बिल्डरला अटक करण्यास टाळाटाळ करीत आले आहेत. दरम्यान, ओस्तवाल बिल्डरने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी ठाणे न्यायालयात धाव घेतली होती. अटकपूर्व जामीन अर्जावर सुमारे महिन्याभरापासून न्यायालयात सुनावणीसाठी तारखा पडत होत्या.
शुक्रवारी (दि. २५) ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश पी. एम. गुप्ता यांनी ओस्तवाल बिल्डरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. यावेळी सरकारी वकील विवेक कडू यांनी बिल्डरच्या अटकपूर्व जामीन अर्जास जोरदार हरकत घेत युक्तिवाद केला. मॅथ्यू यांच्या वतीने कन्हाई बिश्वास यांनी बाजू मांडली.