ठाणे : फेर मतमोजणीसाठी महाविकास आघाडीच्या बहुतेक उमेदवारांनी निवडणूक विभागाकडे पैसे भरले आहेत. मात्र मतदान यंत्रातील माहितीच नष्ट केल्याने यंत्रात काहीच बिघाड नव्हता, हे दाखवण्यास दुसरी यंत्रे दाखवली जाणार असल्याचा दावा शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी केला.
आव्हाड म्हणाले की, ज्या यंत्रात मतदान झाले, ती दाखवणार नसतील आणि त्याजागी दुसरी यंत्रे दाखवणार असतील, तर फेरमतमोजणीचा उपयोग काय आहे. ज्या मतदान यंत्रात मतदान झाले, त्यातील मतदानाची माहिती नष्ट केली आहे. २०१९ ते २०२४ या कालावधीत पाच लाख नवीन मतदार नोंदणी झाली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत ४६ लाख नवीन मतदान झाले. निवडणूक विभागाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही आणि जुन्याच यंत्रणा आहेत. आपली मतदार यादी योग्य नसते. त्यातील दुबार मतदारांबाबत तक्रारी करूनही ती वगळली जात नाहीत. पाच वर्षांत पाच लाख मतदार वाढले असताना, सहा महिन्यात ४६ लाख मतदार वाढले कसे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
n पक्षाच्या प्रतिनिधींसमोर मतयंत्रे बंद केली जातात. तेव्हाच मतांची आकडेवारी निवडणूक विभागाला प्राप्त होते. परंतु दुसऱ्या दिवसांपर्यंत निवडणूक विभागाच्या आकडेवारीत वाढ होते कशी, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला.
n यात निवडणूक विभागाचा सहभाग आहे. निवडणूक विभागाने या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत. कारण, ही उत्तरे मिळणे हा आमचा अधिकार आहे.
n असेच सुरू राहिले तर भारत हा लोकशाही देश होता, हे इतिहासात लिहिण्याची वेळ येईल, असेही ते म्हणाले. त्यामुळे हा सगळा घोटाळा असून त्याच्या शेवटपर्यंत जाऊन शोध घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.
आव्हाड यांचे परांजपे यांना प्रति आव्हान
मतदान यंत्र हॅक होत असेल, तर जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुकीला सामोरे जावे, असे खुले आव्हान अजित पवार गटाचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले होते. त्यावर सरकारला बॅलेटवर निवडणूक घेण्यास सांगाच, राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढून एक लाख मताधिक्याने जिंकेल, असे प्रत्युत्तर आव्हाड यांनी शनिवारी दिले.