डोंबिवली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्बंधांबाबत आखून दिलेल्या गटांत कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्राचा दुसऱ्या गटात समावेश झाल्याने सोमवारपासून दुकाने आणि अन्य आस्थापना नियमित सुरू होणार आहेत. यात मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होऊ शकते. यावर वाहतूक नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावात लादलेले निर्बंध कोरोना रुग्णांची संख्या कमी होताच काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. निर्बंध शिथिल होताच रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढली आहे. यात वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नसल्याने वाहतूककोंडीच्या समस्येत भर पडली आहे. नो एंट्रीतही सर्रास वाहने घुसवली जात आहेत. आता केडीएमसीचा दुसऱ्या गटात समावेश झाल्याने सोमवारपासून काही आस्थापना नियमित चालू राहणार आहेत. यात दुकानांसह हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल, थिएटर, खासगी कार्यालयांसह अन्य आस्थापनांचा समावेश आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढणार आहे. नो एंट्रीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
अधिकृत पार्किंगच्या
ठिकाणीच वाहने उभी करा
रस्त्यालगतच्या पी १, पी २ पार्किंगसह नो पार्किंग याप्रमाणेच आपली वाहने अधिकृत पार्किंगच्या ठिकाणी पार्क करावीत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर डोंबिवली वाहतूक विभागाकडून कारवाई केली जाईल, असे पोलीस निरीक्षक गित्ते यांनी स्पष्ट केले आहे.
--------------------------------------------------