लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी बनवलेल्या अहवालाची वाहतूक विभागाने अंमलबजावणी न केल्यास चक्काजाम आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेचे नगरसेवक मंदार हळबे यांनी दिला आहे. डोंबिवलीतील वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी शहर वाहतूक विभागाने अहवाल बनवला आहे. हा अहवाल ठाण्यातील वाहतूक विभागाच्या उपायुक्तांना पाठवण्यात आला आहे. त्याला दोन महिने उलटले आहेत. या अहवालाबाबत नागरिकांकडून सूचना, हरकती मागवण्यात आल्या. मात्र, त्यावर जनसुनवाणीही झालेली नाही. शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असल्याने चक्काजाम आंदोलन केले जाईल. त्यात नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन हळबे यांनी केले आहे. हळबे म्हणाले की, रेल्वे स्थानकानजीक असलेल्या रामनगर, राजाजी पथ येथे वाहतूककोंडीची समस्या प्रकर्षाने भेडसावत आहे. स्टेशन रोड कोंडीमुक्त करण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांना चाप लावणे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच वाहतूक विभागाचे नियोजन अत्यावश्यक आहे. केळकर रोड, राजाजी पथावरील व्यापाऱ्यांनीही आंदोलनासाठी सहकार्य करावे. तसे झाल्यास या समस्येतून मार्ग निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
...अन्यथा चक्काजाम आंदोलन
By admin | Published: June 10, 2017 1:11 AM