ठाणे - कळवा, विटावाकरांची वाहतुक कोंडीतून सुटका व्हावी म्हणून कळवा खाडीवर तिसरा पुल उभारण्याचे काम सुरु झाले आहे. परंतु हे काम तीन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित असतांनाही आजही याचे काम रखडलेले आहे. त्यात ज्या ठेकेदारांना हे काम देण्यात आले आहे, त्यांना मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे आता शिल्लक राहिलेले काम संबधींत ठेकेदाराकडून काढून घ्यावे आणि या कामासाठी दुसरा ठेकेदार नियुक्त करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केली आहे. तसेच हा नवा केव्हा खुला होणार याची माहिती पालिकेने द्यावी अन्यथा ठेकेदाराला आणि त्याला पाठीशा घालणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना वेळ पडल्यास काळे फासले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
ठाण्यात मेट्रोचे काम सुरु असल्याने ठाणेकरांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. केवळ घोडबंदरच नव्हे तर कळवा उड्डाणपुलावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. कळवा येथील ब्रिटिशकालीन पूल बंद केल्यानंतर सध्या अस्तित्वात असलेल्या एकाच उड्डाणपुलावर सध्या वाहतुकीचा भार सुरु आहे. त्यामुळे या पुलावर रोजच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी गेल्या चार वर्षापूर्वी या उड्डाणपुलाचे काम सुरु करण्यात आले आहे. सप्टेंबर २०१९ पर्यंत कळवा उड्डाणपूलाचे काम पूर्ण होईल असा दावा पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र २०१४ साली उड्डाणपुलाच्या कामासाठी वर्क आॅर्डर देण्यात आली असल्याची माहिती मिलिंद पाटील यांनी यावेळी दिली. सुमारे १८३ कोटी रुपये खर्च करून हा उड्डाणपूल बांधण्यात येत असून वर्क आॅडर दिल्यापासून तीन वर्षात हे काम पूर्ण होणार होते. मात्र दिलेल्या मुदतीमध्ये हे काम पूर्ण झाले नसून कामाच्या दर्जाबाबत देखील आनंद परांजपे आणि मिलींद पाटील आणि सुहास देसाई यांनी प्रश्न उपस्थित केला आहे . सुप्रीम या कंपनीचा एमएमआरडीएने कल्याण येथील उड्डाणपुलाचे काम काढून घेतले असून जे कुमार मुंबईमध्ये काळ्या यादीमध्ये आहे. या दोघांनीही कळवा उड्डाणपुलाचे काम वेळेत न केल्याने प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून हे काम दुसºया ठेकेदारांना देण्यात यावे अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.