ठाणे : मालमत्ताकराची वसुली वाढावी आणि या प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी मालमत्ताधारकांनी त्यांच्या मालमत्तांमध्ये केलेले बदल, वाढीव बांधकामांची माहिती स्वत:हून पालिकेकडे सादर करण्याचे आवाहन पालिकेच्या मालमत्ताकर विभागानेकेले आहे. ते सादर न केल्यास पालिकेच्या सर्व्हेक्षणात मालमत्तांमध्ये काही बदल आढळल्यास मालमत्ताकराच्या दुप्पट दंड किंवा व्याज आकारण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.महापालिकेने मागील काही वर्षात मालमत्ताकरात वाढ करण्यासाठी विविध स्वरुपाचे उपाय केले आहेत. त्यानुसार मालमत्ताकरात काही प्रमाणात का होईना वाढ झालेली आहे. तसेच पाणीकराच्या वसुलीसाठीदेखील उपाय योजले जात आहेत. तसेच या दोन्ही करात मागील दोन वर्षात वाढदेखील केली आहे. परंतु, त्यांची वसुली सदोष पद्धतीने होत होती. ५०० चौरस फुटांवरील घरांची पाणी बिले क्षेत्रफळानुसार देण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेऊनही त्याची अंमलबजावणी पालिकेला करता आलेली नाही. त्यातील दोष दूर करून यंदा त्या पद्धतीने बिले पाठवली आहेत.दरम्यान त्याच धर्तीवर आता मालमत्ताकरवसुली पारदर्शक करण्याचा पालिकेचा मानस आहे. पालिकेच्या रेकॉर्डवर मालमत्तांच्या जशा नोंदी आहेत, त्यानुसार त्यांना बिले पाठविली जात आहेत. २०११-१२ साली पालिकेने त्यासाठी एक सर्वेक्षण केले होते. त्याचा आधार यासाठी घेतला जात आहे. मात्र, या नोंदी आणि प्रत्यक्षातील मालमत्तांचा आकार यात प्रचंड तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक मालमत्ताधारकांनी आपल्या घरांमध्ये अंतर्गत बदल करून क्षेत्रफळ वाढविले आहे. अनेकांनी निवासी जागेचा वापर व्यावसायीक कामांसाठी सुरू केला आहे. काही जणांनी मालमत्तांची पुनर्बांधणी केली आहे किंवा ती भाड्याने दिलेली आहे. मालमत्ताकरात सुधारणा किंवा बदल करण्यासाठी त्याबाबतची माहिती पालिकेला देणे गरजेचे असते. मात्र, बहुसंख्य मालमत्ताधारकांनी ती दिलेली नाही. त्यामुळे याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी स्वत: मालमत्तासंदर्भात माहिती पालिकेला द्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. पुढील सात दिवसांत मालमत्तांमध्ये केलेल्या बदलांची माहिती पालिकेच्या स्थानिक प्रभाग कार्यालयांमध्ये किंवा dmctax@thanecity.gov.in या इमेल आयडीवर सादर करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी जो अर्ज करावा लागणार आहे त्याचा नमुना www.thanecity.gov.in या बेवसाईटवर उपलब्ध आहे.
...अन्यथा दंडात्मक कारवाई, पालिकेचे ठाणेकरांना आवाहन : मालमत्तांमध्ये केलेले बदल सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 2:34 AM