...अन्यथा महापालिकेच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन; शहर कॉंग्रेसचा इशारा
By अजित मांडके | Published: June 1, 2023 03:52 PM2023-06-01T15:52:50+5:302023-06-01T15:53:27+5:30
येत्या १० दिवसात या समस्या सोडविण्यात याव्यात अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरुन पाहणी दौरा करुन पालिकेचे पितळ उघडे पाडू आणि महापालिकेच्या विरोधात हल्ला बोल आंदोलन करु असा इशाराही त्यांनी यावेळी दिला
ठाणे : ठाणे महापालिकेने शहरातील विविध कामांबाबत ३१ मे ची डेड लाईन दिली होती. मात्र महापालिकेकडून दिशाभुल करणारी माहिती दिली जात असल्याचा आरोप ठाणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. येत्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असतांना नाले सफाईची कामे ५० टक्केच झाले असून सार्वजनिक शौचालयांची अवस्था दयनीय आहे. तर रस्त्यांची कामे देखील अर्धवट आहेत. गटार, पायवाटांची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ठाणेकरांचे हाल होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. परंतु यावर तोडगा निघाला नाही तर पुढील आठवड्यात महापालिकेवर हल्ला बोल आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
शहर कॉंग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन शिंदे आणि राहुल पिंगळे हे देखील उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांनी शहरातील विविध प्रभागातील नालेसफाई आणि शौचालयांची कशी अवस्था आहे, याचे फोटोद्वारे पुरावेच सादर करुन एक प्रकारे महापालिकेने आव्हान दिले आहे. येत्या काही दिवसात पावसाळा सुरु होणार आहे. परंतु शहरात सुरु असलेली रस्त्यांची कामे अवघी ५० टक्के झाली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आयुक्त ३१ मे पूूर्वी कामे पूर्ण करणार असल्याचा दावा केला होता. परंतु त्यांचा दावा फोल ठरला असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे आहे ती कामे थांबून रस्ते सुस्थितीत कसे राहितील याचा विचार पालिकेने करावा असेही त्यांनी सांगितले. नाले सफाईची कामे पूर्ण करावीत, शौचालयांची अवस्था दयनीय असून कुठे दरवाजे नाहीत, कडी कोयंडा नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे जो निधी आणलेला आहे, तो शौचालये, गटार पायवाटांकडे वळवावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
येत्या १० दिवसात या समस्या सोडविण्यात याव्यात अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरुन पाहणी दौरा करुन पालिकेचे पितळ उघडे पाडू आणि महापालिकेच्या विरोधात हल्ला बोल आंदोलन करु असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. महापालिका आयुक्तांनी रामदास पाध्येंचा बोलका बाहुला होऊ नये अशी विनंती देखील चव्हाण यांनी केली. अनाधिकृत बांधकामांवर कितीही शेरे मारले तरी देखील शहरात ही बांधकामे आजही सुरुच असल्याचा आरोपही त्यांनी केला. सर्वांची कामे आयुक्तांनी करावीत, सत्ताधाºयांची कामे अधिक करीत असतांना जनतेची कामे देखील करावीत अशी सुचनाही त्यांनी केली. रोगराई बाबत उपाय योजना करण्यात याव्यात अशी मागणही त्यांनी केली.