ठाणे : राज्यात आता पुन्हा मिनी लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे पुन्हा सर्वच यंत्रणा त्या दृष्टीकोनातून कामाला लागल्या आहेत. ठाण्यातून विविध मार्गांवर धावणाऱ्या एसटीच्या बसेस आता लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याबाहेर न पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच इतर ज्या काही महत्त्वाच्या सूचना घालून दिल्या आहेत, त्यांचे पालनही केले जाणार असल्याचे एसटी महामंडळ, ठाणे यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाची दुसरी लाट वेगाने वाढू लागल्याने त्याचा परिणाम म्हणून राज्यात मिनी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार आता शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. एसटी प्रशासनदेखील आता कामाला लागले आहे. आता कुठे पहिल्या लाटेतून सावरत असतांना दुसरी लाट आल्याने एसटी महामंडळाला याचा आता आणखी फटका बसणार आहे. असे असले तरी शासनाने जे काही नियम घालून दिले आहेत, त्याचे पालन केले जाईल, असेही एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार प्रत्येक प्रवाशाला एसटीमध्ये प्रवास करतांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. तसेच एसटीची बस वारंवार सॅनिटाईज केली जाणार आहे. तसेच चालक आणि वाहकांनादेखील महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत. परंतु, कोरोनामुळे आधीच प्रवाशांची संख्या रोडावली असल्याने उभ्याने प्रवास करण्याचे प्रमाण घटले आहे. तरीसुद्धा उभ्याने प्रवास करण्यास मज्जाव करण्यात येणार आहे. याशिवाय शुक्रवार ते सोमवार या दिवसांत घेण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात जिल्हाअंतर्गतच एसटी धावणार असून, जिल्ह्याबाहेर एसटी सोडली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. तसेच ज्या मार्गांवर प्रवासी नसतील त्या मार्गांवरील एसटीदेखील बंद करण्यात येणार आहे.
.........
लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याबाहेर एसटी सोडली जाणार नाही, तसेच प्रत्येक प्रवाशाने मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. उभ्याने कोणालाही प्रवास करू दिला जाणार नाही. (विनोदकुमार भालेराव - विभागीय नियंत्रक, ठाणे)