ठाणे: केवळ शिवीगाळ केल्याच्या रागातून तानाजी विठ्ठल शिंदे (२८, रा. जिजामातानगर, वागळे इस्टेट, ठाणे) या मित्राचा खून करणाऱ्या त्रिकुटापैकी एका १६ वर्षीय हल्लेखोराला ताब्यात घेतल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी दिली. यातील अन्य दोन हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. तानाजी हा वागळे इस्टेट रोड क्रमांक ३३ परिसरात वास्तव्याला होता. २८ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास पाचपाखाडी येथे जावून येतो, असे भाऊ ज्ञानेश्वर शिंदे (३४) यांना सांगून तो घराबाहेर पडला.
त्यानंतर २९ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट, रामचंद्रनगर प्रतिक सोसायटीच्या पाठीमागील रस्त्यावर डोक्यावर मारहाणीच्या खुना आणि रक्तबंभाळ अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या डोक्यावर प्रहार करुन त्याचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात आढळले. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रविण माने यांच्या पथकाने खबऱ्यांच्या मदतीने तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हल्लेखोरांपैकी एका १६ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले. तेंव्हा तानाजी याने दारुच्या नशेतच शिवीगाळ केल्याने वचपा काढण्यासाठी त्याच्या डोक्यावर २९ जानेवारी रोजी पहाटे ५.३० ते ६ वाजण्याच्या सुमारास लाकडी दांडक्याने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने प्रहार केल्याची कबूली या मुलाने दिली. यात तो गंभीर जखमी झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. हल्ला करणाऱ्या अन्य दोन साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले.