कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरे व २७ गावांना पाणीपुरवठा करणाºया धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी गावांमधील ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेत चर्चा केली. पाणीसमस्या दोन दिवसांत न सुटल्यास तेथील ग्रामस्थांचा उद्रेक होईल, असा इशारा त्यांनी दिला.२७ गावांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. गावांना ३२ एमएलडी पाणीकोटा मंजूर झाला आहे. त्यातच, २० एमएलडी पाणी वाढवून देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे. असे असतानाही एमआयडीसीकडून अन्याय केला जात असल्याचे भोईर यांचे म्हणणे आहे. एमआयडीसीवर दबाव ठेवण्यात केडीएमसी अपयशी ठरल्याने २७ गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या शिगेला पोहोचल्याचे भोईर यांनी सांगितले. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही या गावांना मोठ्या प्रमाणावर पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला निवेदन देऊनही परिस्थितीत बदल झालेला नाही. त्यामुळे भोईर यांनी आयुक्तांना दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.दरम्यान, चर्चेच्या वेळी आयुक्त वेलरासू यांनी एमआयडीसीच्या अधिकाºयांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. पण, संपर्क होऊ शकला नाही. या वेळी नगरसेवक रमाकांत पाटील, जालिंदर पाटील, सुनीता खंडागळे आणि गोळवली येथील ‘देशमुख होम्स’ गृहसंकुलातील रहिवासीही उपस्थित होते.
पाणीटंचाई दोन दिवसांत दूर न झाल्यास उद्रेक, उपमहापौरांचा इशारा : २७ गावांचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 2:18 AM