कल्याण : डोंबिवलीच्या ग्रामीण भागात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांसोबत मनसे आमदार राजू पाटील यांनी बुधवारी केडीएमसी आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी लवकरात लवकर पाणीप्रश्न सुटला पाहिजे, अशी मागणी केली. इतकेच नाही तर अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही तर एका दिवशी नागरिकांचा उद्रेक होईल, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.
डोंबिवली पूर्वेतील काही परिसरात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. नांदिवली टेकडी, देसलेपाडा, भोपर, सागाव परिसराला पाणीटंचाई भेडसावत आहे. तेथे कधी पाणी येते, तर कधी येत नाही. अनेकदा पाण्याचा दाबही कमी असतो. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तासन्तास पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. यासंदर्भात पाटील यांनी केडीएमसी अधिकारी आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांची बैठक डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात घेतली. यावेळी उपस्थित असलेले नागरिक संतप्त झाले. पाणी कमी दाबाने का येते? औद्योगिक भागातील कंपन्यांना पाणी मिळते, मग नागरिकांना का मिळत नाही, असे प्रश्न त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना विचारले. त्यावर लवकरात लवकर ही समस्या सुटली पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
याबाबत पाटील म्हणाले, ‘‘सात दिवसांत नागरिकांना दिलासा मिळणार आहे. येत्या डिसेंबरपर्यंत एक लाइन टाकण्याचे काम पूर्ण होईल. त्याचबरोबर अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. त्यानंतर पाणीप्रश्न सुटेल, अशी आशा आहे; मात्र पाणीप्रश्न सुटला नाही तर नागरिकांचा उद्रेक होईल.
ब्रेकडाऊनमुळे समस्या
याबाबत एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता कालीदास भांडेकर यांनी सांगितले की, केडीएमसीचे अभियंता आणि एमआयडीसीचे अभियंता संयुक्त पाहणी करतील. दुर्दैवाने दोन तीन वेळा ब्रेकडाऊन झाल्याने पाण्याचा प्रश्न उद्भवला. लवकर ही समस्या सुटेल.
-------