ठाणे : सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या पुढाकाराने गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या "वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा"च्या वतीने आयोजित तीन दिवसांच्या महाआरोग्य शिबिरात मंगळवार, १ मे रोजी, शिबिराच्या अखेरच्या दिवशी गर्दीचा जणू नवा विक्रम रचला गेला. एकाच दिवसात तब्बल १० हजार गरजू रुग्णांनी तपासणी आणि उपचारांचा लाभ घेतला. तीन दिवसांत २० हजार रुग्णांची विनामूल्य तपासणी या शिबिरात करण्यात आली असून २ कोटी रुपयांच्या औषधांचे विनामूल्य वाटप देखील करण्यात आले.मा. ना. एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी सदर शिबिराचा समारोप झाला. शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहता अशा प्रकारच्या शिबिराची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. शिवसेना नेहमीच ठाणेकरांच्या गरजेला धावून गेली आहे, त्यामुळे अशा शिबिरांचे वरचे वर आयोजन केले जाईल, अशी ग्वाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिली. गेले तीन दिवस दिवस-रात्र रुग्ण सेवेत राबणारे डॉक्टर्स आणि निमवैद्यकीय पथकातील कर्मचाऱ्यांचा विशेष गौरवपत्र देऊन श्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तब्बल ३५०हून अधिक डॉक्टर्स आणि तितकेच निमवैद्यकीय कर्मचारी अशा सुमारे ७०० जणांच्या पथकाने सर्वसाधारण तपासणीपासून हृदयरोग, कर्करोग, त्वचारोग, नेत्रतपासणी, अस्थिव्यंग, मधुमेह अशा विविध आजारांची तपासणी करून औषधे दिली, तसेच गरजूंवर लवकरच ठाण्याच्या नामांकित रुग्णालयांमध्ये विनामूल्य अथवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. नेत्ररोग, हृदयरोग, कर्करोग, मेंदू रोग, अवयव प्रत्यारोपण, स्त्रीरोग, मानसिक आरोग्य, ग्रंथींचे विकार, जेनेटिक विकार, मूत्रविकार, मधुमेह, श्वसनाचे विकार, त्वचारोग, कान, नाक, घसा, प्लॅस्टिक सर्जरी, दंतरोग, लठ्ठपणा, हार्निया, अॅपेंडिक्स, आतड्याचे विकार, अस्थिव्यंगोपचार, बालहृदयविकार अशा सर्व प्रकारच्या आजारांवर येथे तपासणी व उपचार करण्यात आले. आयुर्वेदिक औषधोपचारासाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. हृदयाला छिद्र असलेल्या बालकांची नोंदणी करण्यात आली असून त्यांच्यावर जून महिन्यात ठाणे येथील सुप्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये मोफत 2ऊ इको तपासणी आणि निदान झालेल्या बालकांची मोफत/सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येतील.ठाण्याच्या किसन नगर-२ येथील नेपच्यून एलिमेंट(जुने टाटा कन्सल्टन्सी कार्यालय), रोड नंबर २,वागळे इस्टेट येथे हे महा आरोग्य शिबीर पार पडले. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे - शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबर २०१७ पासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम ठाणे (पूर्व) येथील कोपरीकार्यालयाच्या माध्यमातून सुरू आहे. ठाणे शहर आणि जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील गंभीर आजाराने ग्रस्त विविध गरजू रुग्णांनाशस्त्रक्रियासाठी आतापर्यंत या कक्षाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात तसेच रुग्णांना योग्य मार्गदर्शन करण्यातयेते. गेल्या साडे पाच महिन्यांच्या कालावधीत सुमारे ५०० गरजू रुग्णांना अंदाजे तीन कोटी रुपयांपर्यंतची मदत या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेनेच्या महाआरोग्य शिबिरात ३ दिवसांत तब्बल २० हजार रुग्णांची तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2018 9:10 PM