- मुरलीधर भवारकल्याण - राज्य सरकारने रिक्षांसाठी मुक्त परवाना धोरण अवलंबल्याने कल्याण आरटीओ हद्दीत १५ हजार नव्या रिक्षांची भर पडली आहे. त्यामुळे रिक्षांची एकूण संख्या ४० हजारांवर पोहोचली आहे. रिक्षांची संख्या वाढली असली, तरी पुरेसे रिक्षातळ नाहीत. पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. त्याचबरोबर रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे.रिक्षांसाठी परमिट दिले जात नसल्याने राज्यभरातील रिक्षा-चालक-मालक संघटनांनी आवाज उठवला होता. त्याची दखल घेत सरकारच्या परिवहन विभागाने रिक्षाचालकांना मुक्त परवाने देण्याचे धोरण स्वीकारले. त्यानुसार, जुलै २०१७ पासून मुक्त परवाने देण्यास सुरुवात केली.कल्याण आरटीओ कार्यक्षेत्रात कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, मुरबाड हा परिसर येतो. मुक्त परवाना देण्यापूर्वी आरटीओ हद्दीतील आयुर्मान संपलेल्या जवळपास दोन हजार रिक्षा भंगारात काढण्यात आल्या. या रिक्षावगळून १ जुलै २०१७ पूर्वी आरटीओ हद्दीत २५ हजार रिक्षा होत्या. मात्र, मुक्त परवाना धोरणानुसार या परिसरातील जवळपास २० हजार रिक्षाचालकांना इरादापत्र देण्यात आले. त्यानुसार, सध्या १५ हजार रिक्षा रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे सध्या ४० हजार रिक्षा आरटीओ हद्दीत आहेत. तर, आणखी पाच हजार रिक्षा लवकरच रस्त्यावर धावणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत रिक्षांची संख्या ४५ हजारांवर पोहोचणार आहे.कल्याण-डोंबिवली परिसरात वाहतूककोंडीची समस्या बिकट आहे. चौकाचौकांत, गल्लोगल्ली असलेले रिक्षातळही त्याला तितकेच जबाबदार आहेत. कल्याण व डोंबिवली स्टेशन परिसरांत बेकायदा रिक्षातळांची संख्या जास्त आहे. रिक्षांच्या संख्येत वाढ होत असताना महापालिकेने पार्किंगची सुविधा केली पाहिजे. दुसरीकडे रिक्षा वाढल्याने रिक्षाचालकांना भाडे मिळणे मुश्कील झाले आहे. मुक्त परवाना धोरणाचा लाभ घेणारे रिक्षाचालक संतोष भगत म्हणाले, मी कर्ज काढून रिक्षा घेतली आहे. १५ हजार परवाना शुल्क भरले आहे. धोरण चांगले आहे. त्याचा फायदाही झाला आहे. आधीचे आणि नवे रिक्षाचालक यांनी योग्य समन्वय, मदतीचे धोरण ठेवल्यास व्यवसायातील मारामार संपुष्टात येऊ शकते. अनेक रिक्षाचालक जादा प्रवासी (ओव्हरसीट) भरतात. मुक्त परवान्यामुळे ओव्हरसीट घेणे कमी झाले आहे, असा दावा केला जात असला, तरी अद्याप काही ठिकाणी रिक्षाचालक ओव्हरसीट घेतल्याशिवाय रिक्षा नेत नाहीत.मुक्त परवाने देणे थांबवावे - रिक्षा संघटनेची मागणीठाणे जिल्हा रिक्षा-टॅक्सी चालक-मालक महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर म्हणाले, सरकारने मुक्त परवाने देणे थांबवावे. रिक्षा घेतली जाते. परंतु, कागदपत्रे नसतानाही स्टेशन परिसरात रिक्षा दिसतात.रिक्षा, टॅक्सी, बस तसेच सार्वजनिक परिवहनसेवा यांच्यात समन्वय साधला जाणे, हे मोटार वाहन कायद्यात नमूद आहे. रिक्षा वाढल्याने रिक्षाचालकांमध्ये भाडे मिळवण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे. जीवघेणी आर्थिक स्पर्धा नसावी.जगण्याची संधी नियंत्रित करणे व त्याचे दर ठरवणे, हे दोन्ही विषय मोटार वाहन कायद्यात अंतर्भूत आहे. त्याचा विचार करून मुक्त परवाने तूर्तास स्थगित करावेत, अशी विनंती सरकारकडे केली आहे.
४० हजार रिक्षांमुळे कोंडीत भर, मुक्त परवान्यांमुळे बसतोय फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 4:32 AM