लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत एप्रिलमध्ये नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असली तरी या आजारातून बरे होऊन घरी परतणाऱ्यांचे प्रमाणही समाधानकारक आहे. सोमवारपर्यंतचा आढावा घेता मागील २६ दिवसांत ३२ हजार ६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.५५ टक्के आहे. महत्त्वाचे वर्षभरात आतापर्यंत १ लाख १ हजार ३५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
गेले वर्षभरातील कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेता सोमवारपर्यंत केडीएमसीच्या हद्दीत १ लाख १७ हजार २३० रुग्ण आढळले आहेत. १ हजार ३९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर १ लाख १ हजार ३५० इतके रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार उडविला आहे. मार्चपासून रुग्णसंख्येत वाढ व्हायला सुरुवात झालेल्या केडीएमसीच्या हद्दीत सध्या दररोज आढळणारी रुग्णसंख्या दीड ते दोन हजारांच्या आसपास आहे. मार्चमध्ये १४ हजार ५८९ रुग्ण आढळून आले होते. ४९ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर आठ हजार ९८२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान एप्रिलमध्ये कोरोनाने कहर केला असून ११ एप्रिलला तर दोन हजार ४०५ रुग्ण आढळले होते. ही आजवरची सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. सोमवापर्यंतच्या मागील २६ दिवसांत ३८ हजार ५७ रुग्ण सापडले आहेत. तर १३८ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी चिंतेत भर टाकणारी असली तरी कोरोनाच्या आजारातून बरे होणाऱ्यांची दैनंदिन संख्याही सध्या एक ते दीड हजारांच्या आसपास पोहोचली आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.५५ टक्के
सोमवारी मात्र ८५४ नव्या रुग्णांची भर पडली तर बरे झालेल्यांची संख्या एक हजार ४४५ होती. १२ एप्रिलपासून ही संख्या हजारांहून अधिक असल्याने समाधान व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.८५ टक्के इतके होते ते आता ८५.५५ टक्क्यांवर पोहोचले आहे.
----------------------------------