जितेंद्र कालेकरठाणे : गेल्या पाच वर्षांत ठाणे जिल्ह्यात ५,२३,०४१ वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली. प्रत्यक्षात वाहनांची संख्या ही सात लाखांहून अधिक आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये ठाणे, कल्याण, नवी मुंबईत २२,८२३ वाहनांची प्रदूषण चाचणी झाली. यातील दोषी २,३३४ चालकांकडून १०,५३,८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
नवीन वाहन सुरुवातीला काही वर्षे सुरळीत चालते. परंतु, कालांतराने त्याची प्रदूषण चाचणी करणे गरजेचे आहे. वाढत्या वाहनांच्या तुलनेत जिल्हाभर २६१ पीयूसी केंद्रे आहेत. कारसाठी १०० तर दुचाकीसाठी ५० रुपयांतही चाचणी होते. एप्रिल ते नोव्हेंबर २०२० दरम्यान ठाण्यात १८,९२०, कल्याणमध्ये २,६९२ तर, नवी मुंबईत १,२११ वाहने आरटीओच्या अधिकाऱ्यांनी तपासली. यामध्ये २,३३४ वाहने दोषी आढळली. ठाण्यातील १,२९७ दोषी चालकांकडून ६,७७,९०० रुपये, कल्याणमध्ये ५६६ जणांकडून १,१९,२०० रुपये तर नवी मुंबईमध्ये ४७१ जणांकडून २,५६,००० दंड वसूल केला आहे.
पीयूसी न करणाऱ्यांना एक हजाराचा दंडप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायू पथकाने किंवा वाहतूक पोलिसांनी जर एखादे वाहन पकडले अन् त्यात ते दोषी आढळले तर संबंधितांवर एक हजार रुपये दंडाची कारवाई केली जाते. अनेकदा वाहन पकडल्यानंतर पीयूसी नसेल तर वाहनचालकांना ते सादर करण्याची सात दिवसांची मुदत दिली जाते. तरीही ते सादर केले नाही, तर ही दंडात्मक कारवाई होते, अशी माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली.
वाहनाची प्रदूषण चाचणी करणे आवश्यक आहे. मर्यादेपेक्षा वाहनांतून जास्त धूर निघत असेल तर वायुप्रदूषणात वाढ होते. त्यामुळे श्वसन, फुप्फुसाशी निगडित विकारांचा संभव असतो. परिणामी, प्रत्येक वाहनाचे प्रदूषण नियंत्रणात राहण्यासाठी शासनाने पीयूसी बंधनकारक केले आहे. ते नसल्यास कलम ११५ तसेच १९० अंतर्गत एक हजार रुपयांचा दंड आकारला जातो. प्रसंगी वाहन जप्तीचीही कारवाई होते.- विश्वंभर शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे.