लोकमत न्यूज नेटवर्क
मुरबाड : लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार बुडाल्याने घर कसे चालवायचे याची चिंता सतावत आहे. अशातच
तालुक्यातील सरळगाव येथील चेतन हा दिव्यांग असूनही त्यावर मात करत तो कीटकनाशके,उंदीर, घुशींना मारणारे औषध विकून आपल्या वृद्ध आईचा व परिवाराचा उदरनिर्वाह करत आहे. त्याच्या जिद्दीला तालुक्यातील नागरिक सलाम करत आहेत. चेतन हा जन्मत: एका हाताने व पायाने दिव्यांग असून वयाच्या आठव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले. यामुळे त्याच्यासमोर आपल्या भविष्याची चिंता सतावू लागली. पण न डगमगता त्याने वडिलांचा कीटकनाशके विकण्याचा व्यवसाय पुढे सुरु ठेवला.
सरळगाव येथे दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात तो औषध विक्री करु लागला. दहावीपर्यंत शाळा शिकला. घरात असणारी वृद्ध आई, भाऊ आणि बहिणीचा तुटपुंज्या उत्पन्नात सांभाळ करणे चेतनसाठी कठीण जात होते. यामुळे शाळेला रामराम ठोकत कुठेतरी काम बघावे या शोधात तो भटकंती करु लागला, परंतु चेतन एका हाताने व पायाने दिव्यांग असल्याने जेथे कामाच्या शोधात जायचा तेथे तो ताठ उभा न राहता कशाचा तरी आधार घेऊन उभा राहायचा. पण प्रत्येक ठिकाणी नकार येत होता. त्याने आपण करत असलेला कीटकनाशक आणि उंदीर, घुशी मारण्याच्या औषध विक्रीचा व्यवसाय पुढे सुरु ठेवला. मुरबाड, सरळगाव, म्हसा, धसई, टोकावडे, किन्हवली ,शहापूर या ठिकाणी भरणाऱ्या आठवडा बाजारात तो व्यवसाय करुन परिवाराचा उदरनिर्वाह करत आहे.