लोकमत न्यूज नेटवर्क माणगाव : गेल्या आठवड्यात उतेखोल येथील वाॅटर सप्लाय रोड परिसरात काही दिवसांच्या अंतराने अचानक सकाळच्या वेळी एकामागोमाग एक अशी दोन गव्हाणी घुबडे मेलेल्या अवस्थेत आढळली. प्राथमिक अंदाजानुसार सध्या चर्चेत असलेला बर्ड फ्ल्यू रोगाने किंवा विषारी उंदिर खाल्याने विषबाधेने कदाचित ती मृत होत असावीत असे वाटत होते; पण प्रत्यक्षात मात्र ती परिसरातील ‘महावितरण’च्या खांबावरील चिनी मातीच्या डिशवर बसल्याने विजेचा झटका बसल्याने खाली पडून मृत झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रत्यक्षदर्शी रवींद्र कुवेसकर बुधवारी रात्री दहा वाजता घरासमोरील रस्त्यावर फिरत असताना जवळच असलेल्या हायटेन्शन लाईनच्या खांबावर कसला तरी आवाज झाला. काहीतरी खाली पडल्याचे जाणवले पण काळोखात काही दिसत नव्हते. जवळ जाऊन पाहीले असता एक पूर्ण वाढ झालेले गव्हाणी घुबड फडफडताना दिसले, त्याच्या दिशेने दोन तीन भटकी कुत्री त्याला हुंगत आली. शाॅक लागल्याने त्याला उडता येत नव्हते. आता ती कुत्री त्याच्यावर झडप घालणार हे लक्षात आल्याने त्या कुत्र्यांना तिथून हाकलले आणि कुवेसकर यांनी आपला मुलगा शंतनूच्या मदतीने शाॅक लागुन पडलेल्या घुबडाला उचलले व घराच्या अंगणात उजेडात आणले.त्याचे निरिक्षण केले असता त्याला जखमा झाल्या नव्हत्या. मात्र, झटका लागल्याने त्याचे संपूर्ण शरीर धडधडत होत. जवळपास एक तास घुबडावर लक्ष ठेऊन नंतर त्याला पाणी पाजून, समोरील चार मजली इमारतीच्या गच्चीवर घुबडांचे वास्तव्य असलेल्या कोनाड्यात त्याला सुरक्षित सोडले.