नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडीतील सवाद येथील जिल्हा कोविड रुग्णालयात फक्त ६ मेट्रिक टन ऑक्सिजन साठा असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांच्या चिंतेत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे याठिकाणी रुग्णांना प्रवेश देण्यासाठी देखील नकार मिळत असल्याचा दावा श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याने सवाद येथील प्रशस्थ जिल्हा कोविड रुग्णालयाच्या सुविधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
मंगळवारी भिवंडीतील शेलार पाडा येथील कोरोना बाधित रुग्ण प्रकाश शेलार यांना जिल्हा कोविड रुग्णालयात प्रवेश दिला नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. श्रमजीवी संघटनेचे भिवंडी तालुका अध्यक्ष प्रमोद पवार यांनी हि बाब समोर आणली आहे. रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरेसा साथ नसल्याने आमच्या रुग्णाला रुग्णालयात प्रवेश देण्यात आला नसल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली आहे. प्रवेश न मिळाल्याने बाधित रुग्ण रुग्णालयाच्या गेट वर तब्बल दिड तास ताटकळत बसला होता. विशेष म्हणजे या रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी असूनही रुग्णाला रुग्णालयात प्रवेश मिळत नसल्याने श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सवाद येथील जिल्हा कोविड रुग्णालयाचे उदघाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २७ मार्च रोजी झाले आहे. मात्र या रुग्णालयाला ऑक्सिजन साठा उपलब्ध झाला नसल्याने उदघाटनाच्या तब्बल २० ते २२ दिवसांपासून हे रुग्णालय बंद होते. अखेर रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनावर नागरिकांचा रोष वाढत असतांना २० दिवसांनंतर ऑक्सिजन उपलब्ध झाल्या नंतर मागील काही दिवसांपूर्वीच हे जिल्हा कोविड रुग्णालय सुरु करण्यात आले. सध्या या रुग्णालयात २३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र या रुग्णालयात केवळ ६ मेट्रिक टन ऑक्सिजन साठा शिल्लक राहिला आहे. या साठा केवळ एक दिवस पुरेल इतकाच असल्याने येथील रुग्णांच्या चिंतेत देखील वाढ झाली आहे .
सवाद कोविड जिल्हा रुग्णालयात ८१८ बेड आहेत. यासर्व बेडसाठी या रुग्णालयाला किमान १८ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे मात्र सध्या या रुग्णालयात २३० रुग्ण ऍडमिट असल्याने या रुग्णालयात दिवसाला ६ ते ८ मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे आज रुग्णालयात ६ मेट्रिक टन ऑक्सिजन साठा उपलब्ध असून एक दिवस पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा सध्या उपलब्ध असल्याने नवीन रुग्नांना प्रवेश द्यावा किंवा कसे याबाबत जिल्हा प्रशासन रुग्णालय प्रशासन निर्णय घेणार आहे तर श्रमजीवी संघटनेच्या आरोपांबाबत बोलायचे तर कोणत्याही रुग्णांना रुग्णालयात प्रवेश नाकारत नाही अशी प्रतिक्रिया भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली आहे.
मंगळवारी या रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे प्रकाश शेलार यांना ऍडमिट करून घेतले नाही त्यामुळे मात्र शेलार यांच्या नातेवाईकांनी त्यांना कुर्ला येथील रुग्णालयात दाखल केले, आजही झिडके येथील एका रुग्णाला या रुग्णालयात प्रवेश मिळाला नाही. कोट्यवधींच्या खर्च करूनही रुग्णानाचे हाल होत असल्याने या रुग्णालयात प्रवेश मिळत नसल्याबाबत आम्ही जल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून या रुग्णालयातील असुविधा अधिकाऱ्यांना दाखवून दिल्या आहेत तसेच गणेशपुरी येथे कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी केली आहे अशी प्रतिक्रिया श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार यांनी दिली आहे.