अंबरनाथ : देशाच्या सैन्यासाठी शस्त्रे आणि इतर सामग्री तयार करणाऱ्या ऑर्डनन्स फॅक्टरीने हवेतून ऑक्सिजन वेगळा करणारे मशीन तयार केले आहे. फॅक्टरीच्या एमटीपीएफ कंपनीतील कामगारांनी हे मशीन तयार केले आहे.
ऑर्डनन्स फॅक्टरीत सैन्यासाठी दारूगोळा तयार केला जातो, तर याच फॅक्टरीच्या एमटीपीएफ कारखान्यात सैन्य आणि नौदलासाठी लागणाऱ्या वाहनांचे पार्टस तसेच इतर अनेक संरक्षणात्मक सामग्री तयार केली जाते. देशातील सर्वांत चांगले अभियंते आणि तंत्रज्ञ येथे मेहनत घेत असतात. याच कारखान्याने आता हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारी मशीन तयार केली आहे. मागील वर्षी व्हेंटिलेटरचा तुटवडा असताना या कारखान्याने व्हेंटिलेटर आणि सॅनिटायझरचीही निर्मिती केली होती, तर यावर्षी ऑक्सिजन निर्मिती करणारी मशीन तयार केली आहे. या कारखान्यात नायट्रोजन गॅस तयार करणाऱ्या दोन मशीन यापूर्वी कार्यरत होत्या. त्यापैकीच एका मशीनमध्ये बदल करून हे ऑक्सिजन मशीन तयार करण्यात आले आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात काही दिवसात एक कोविड रुग्णालय सुरू होणार असून त्यात हे मशीन बसविले जाणार आहे. ऑक्सिजन निर्मिती करून थेट रुग्णांपर्यंत हा ऑक्सिजन पोहोचविला जाईल. याद्वारे दिवसाला ४८ हजार लिटर ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार आहे.
ऑक्सिजनची गरज पाहता कंपनीतील यंत्रसामग्रीचा वापर करून ऑक्सिजन निर्मिती करणारे मशीन तयार करण्यात आले आहे. त्याचा वापर कोरोना रुग्णांवर करता येणार आहे. - राजीव कुमार, सरव्यवस्थापक, एमटीपीएफ, अंबरनाथ