ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता जाणवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच ऑक्सिजन सयंत्रामध्ये गळती होऊन काही ठिकाणी रुग्णांना प्राणदेखील गमवावे लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हाच संभाव्य धोका लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार कोरोना या साथरोगासाठी उभारलेल्या रुग्णालयांमधील ऑक्सिजन पाईपलाईनमधील गळती शोधण्यासाठी ऑक्सिजन लिक डिटेक्शन इमेजर करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. यामुळे पाईपलाईनमधून ऑक्सिजन पुरवठा करताना एखाद्या वेळेस त्या पाईपलाईनला गळती झाल्यास त्याची तत्काळ माहिती महापालिकेच्या संबंधीत यंत्रणेला मिळणार आहे. या योजनेची निविदा अंतिम झाली असून दोन दिवसात कार्यादेश दिला जाणार आहे.
मुंबई महापालिकेनेदेखील अशा स्वरूपाचे पाऊल उचलले आहे. त्यानंतर आता ठाणे महापालिकेनेही कोरोना रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नाशिक, वसईमध्ये ऑक्सिजन गळती होऊन काहींना आपले प्राण गमवावे लागले होते. तसेच याच कोरोनाच्या लाटेत ऑक्सिजनची कमतरतादेखील भासली होती. त्यामुळेच पालिकेने पार्किंग प्लाझा कोविड सेंटर, ग्लोबल कोविड सेंटर, व्होल्टास येथे देखील ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी केली आहे. आयसीयुमध्ये दाखल रुग्णांना किंवा ऑक्सिजनवरील रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. परंतु, ऑक्सिजन गळतीच्या घटना घडू नयेत या उद्देशाने महापालिकेने ही ठोस पावले उचलली आहेत.
ठाणे महापालिकेच्या ग्लोबल, पार्किंग प्लाझा, व्होल्टास आणि मुंब्रा येथील कोविड सेंटरमध्ये ही यंत्रणा बसविली जाणार आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून १५० मीटरपर्यंत याची माहिती उपलब्ध होणार आहे. ज्या ठिकाणी ऑक्सिजनची गळती असेल, त्याठिकाणी ही यंत्रणा ब्लिंक होणार आहे. त्यामुळे त्याची तत्काळ माहिती होऊन ऑक्सिजनची गळती रोखण्यात येऊन रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी मदत होणार आहे.
- ऑक्सिजनसह आर्थिक बचत होणार
यासाठी दोन व्यक्तींची नेमणूक केली जाणार असून त्यांच्या माध्यमातून प्रत्येक केंद्रातील ऑक्सिजन प्लॅन्टसह रुग्णालयातील पाईपलाईनची रोजच्या रोज पाहणी केली जाणार आहे. शिवाय एखाद्या रुग्णाला जास्तीचा ऑक्सिजन लागत असेल आणि गळतीमुळे त्याला योग्य प्रकारे पुरवठा होत नसेल, तर याचीही माहिती या यंत्रणेद्वारे उपलब्ध होणार आहे. तसेच ऑक्सिजनचा पुरेपूर वापर करण्याबरोबरच साठ्यावरदेखील नियंत्रण ठेवले जाणार असल्याने यातून आर्थिक व ऑक्सिजनच्या साठ्याचीही बचत होणार आहे.
दोन दिवसात कार्यादेश देणार
यासाठी २४ लाख ५९ हजार ९४६ रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यासंदर्भातील निविदा अंतिम झाली असून येत्या दोन दिवसात या कामाचे कार्यादेश दिले जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. भविष्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.